विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदार आणि विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर चर्चा !

महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली !

मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने ४ मार्च या दिवशी राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्या वेळी विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचे सूत्र आणि विधानसभा अध्यक्ष निवडणूक यांवर ‘सकारात्मक’ चर्चा झाली आहे, अशी माहिती शिष्टमंडळातील नेत्यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मंत्री एकनाथ शिंदे, जयंत पाटील, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, अनिल परब, नाना पटोले आणि सतेज पाटील होते. अर्धा घंट्यापेक्षा अधिक वेळ ही बैठक चालली. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या विषयावर राज्यपालांशी चर्चा झाली. त्याचसमवेत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी अनमुती मिळावी, ही विनंती राज्यपालांकडे केली आहे, अशी माहिती शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ९ मार्च या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अनुमती मागितली. तो दिनांक सोयीचा वाटतो. राज्यपाल याविषयी कळवतील, असे शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ नये, असे भाजपचे प्रयत्न आहेत. यावरून भाजपला उच्च न्यायालयानेही फटकारले आहे. विधानभवनातील ३ मार्च या दिवशी झालेल्या प्रकाराविषयी चर्चा झाली का ?, असा प्रश्न पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना विचारला. त्या वेळी त्यांनी राज्यपालांना ‘जे झाले ते झाले. ते आता मागे टाका आणि विधान परिषदेच्या १२ आमदारांची धारिका स्पष्ट करा’, असे सांगितले आहे. राज्यपालांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांच्याकडूनही सकारात्मक उत्तर अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.