मिरज, ४ मार्च (वार्ता.) – समर्थभक्त श्री. माधवराव गाडगीळ मित्रपरिवार यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या कालावधीत काशी विश्वेश्वर मंदिर येथे महाशिवरात्र कीर्तन महोत्सव आणि आरोग्य शिबिर पार पडले. या तिन्ही दिवशी रात्री ७ ते ९ या वेळेत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. शेखरबुवा व्यास यांची कीर्तने झाली. महोत्सवाचा प्रारंभ २७ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ वाजता गीतेच्या १८ व्या अध्याय पठणाने झाला. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत विष्णुसहस्रनामाची ७ आर्वतने करण्यात आली. २८ फेब्रुवारी या दिवशी पहाटे ४.४५ ते सायंकाळी ६ या वेळेत १३ घंटे १५ मिनिटे १० लाख ४० सहस्र ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप करण्यात आला.
महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे १ मार्च या दिवशी पहाटे ५ वाजता श्रींच्या पिंडीवर लघुरुद्राभिषेक करण्यात आला. याच दिवशी सकाळी १० पासून विनामूल्य आरोग्य शिबिर घेण्यात आले. ‘सेवासदन’ रुग्णालयाचे डॉ. रविकांत पाटील यांच्या वतीने हृदयरोग, मेंदूरोग, मधुमेह असणार्या रुग्णांची पडताळणी करण्यात आली. ‘तीर्थराज’ रुग्णालयाचे डॉ. हर्षल कुलकर्णी यांनी रुग्णांच्या हाडांची ठिसूळता पडताळली, तसेच नेत्रतज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी यांच्या वतीने मोतीबिंदू, काचबिंदू असलेल्या रुग्णांची पडताळणी करण्यात आली. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ‘श्री गजानन महाराज महिला भजनी मंडळ’ यांचे भजन झाले. रात्री १२ वाजता श्रींच्या पिंडीची पूजा करून उसाच्या रसाचा अभिषेक करण्यात आला.
या महोत्सवास ह.भ.प. दीपक (नाना) केळकर, आमदार श्री. सुधीर गाडगीळ, भाजपचे नेते श्री. सुरेशबापू आवटी, नगरसेवक श्री. पांडुरंग कोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील, नगरसेवक श्री. करण जामदार, निरंजन आवटी यांसह अन्य मान्यवरांनी भेटी दिल्या.
क्षणचित्रे
१. मिरज येथील डॉ. संदीप देवल यांची सर्बिया येथील ‘कॅन्सर रिसर्च सेंटर’ येथे शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याने त्यांचा आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
२. सनातन संस्थेचे प्रवचन आयोजित करणे, तसेच ग्रंथप्रदर्शनासाठी मांडव घालून देणे, असे सहकार्य आयोजकांनी केले.