सनातनच्या संत प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…
प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. पूजेसाठी आणलेल्या फुलांमध्ये शेवंतीची फुले पाहून ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणांवर वाहूया’, असा विचार मनात येणे
‘२५.११.२००५ (कार्तिक कृष्ण पक्ष नवमी) या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांची पुण्यतिथी होती. त्या दिवशी सकाळी पूजा करतांना घरी पूजेसाठी आणलेल्या फुलांमध्ये मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर जशी शेवंतीची फुले वाहिली होती, त्याच आकाराची आणि अगदी तशीच शेवंतीची फुले मिळाली. ती फुले पाहून मला पुष्कळ आश्चर्य वाटले. मी ती फुले पू. फडकेआजींना (आताच्या प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके यांना) दाखवली. त्या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांची पुण्यतिथी असल्याने माझ्या मनात ‘त्यांच्या छायाचित्राला ही फुले वाहूया’, असा विचार आला. तो विचार मी पू. आजींना सांगितल्यावर त्यांनीही आनंदाने अनुमती दिली.
२. प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणांवर वाहिलेली फुले दुसर्या दिवशीही अगदी जशीच्या तशीच रहाणे, ती फुलेही पू. आजींनी एका डबीत ठेवण्यास सांगणे आणि ती फुले साधिकेने वाहिलेली असल्याने परात्पर गुरुदेवांच्या चरणांवर वाहिलेल्या फुलांजवळ न ठेवता ती फुले दुसरीकडे ठेवणे
त्यानंतर मी पूजा करून प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणांवर ती शेवंतीची फुले वाहिली. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर मी पाहिले असता ती शेवंतीची फुले अगदी जशीच्या तशी होती. मी ती फुले पू. आजींनाही दाखवली. तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद झाला. प.पू. आजींनी ती फुलेही एका डबीत ठेवण्यास सांगितले. प.पू. आजींनी ठेवलेली शेवंतीची फुले परात्पर गुरुदेव आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र असलेल्या पटलावर होती. त्या वेळी मी ती फुले प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला वाहिली असल्याने परात्पर गुरुदेवांच्या चरणांवर वाहिलेल्या फुलांजवळ ‘मी वाहिलेली फुले कशी ठेवणार ?’, या विचाराने मी ती फुले दुसरीकडे ठेवली.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ती फुलेही परात्पर गुरुदेवांच्या चरणांवर वाहिलेल्या फुलांजवळच ठेवण्यास सांगून ‘एकमेकांच्या सत्संगाने ती फुलेही छान रहातील’, असे सांगणे
वर्ष २००९ मध्ये सौ. अंजली मुकुल गाडगीळ (आताच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) यांना ती फुले दाखवली. त्या म्हणाल्या, ‘‘फुले अतिशय छान आहेत. चार वर्षे झाली, तरी किती छान राहिली आहेत.’’ त्या वेळी मला त्यांनी सांगितले, ‘‘ही फुलेही आता प.पू. आजींनी जी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर वाहिलेली) फुले ठेवली आहेत, त्याच्याच बाजूला ठेवा. एकमेकांच्या सत्संगाने ती फुलेही छान रहातील.’’ त्यानंतर त्यांनीच मला दोन्ही फुले ठेवण्यासाठी दोन सारख्या आकाराच्या आणि पारदर्शक डब्या आणून दिल्या.
४. ‘आता वर्ष २०२१ मध्येही १६ वर्षे झाली, तरी ती फुले चांगली राहिली आहेत. त्या फुलांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे ‘एकमेकांच्या सत्संगातून चैतन्य ग्रहण केल्याने त्या फुलांना त्याचा लाभ झाला’, असे लक्षात येते.
५. जाणवलेले सूत्र
‘प.पू. फडकेआजींचा भाव आणि त्यांच्या पवित्र वास्तूत वास्तव्य यांमुळे ही फुलेही कृतज्ञताभावात आहेत’, असे मला जाणवते.
६. अनुभूती
त्या फुलांकडे पाहिल्यावर माझा नामजप चालू होतो आणि मन स्थिर होते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अपार कृतज्ञतेने मन भरून येते.
‘परात्पर गुरु डॉक्टर, आपली कृपा आणि प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांच्यातील भाव यांमुळे ही फुले अजूनही चांगली राहिली आहेत. आतापर्यंत आपलीच कृपादृष्टी असल्यामुळे ती फुले छान राहिली आहेत. ‘इथून पुढेही आपली कृपादृष्टी सतत त्या फुलांवर असू दे आणि त्या फुलांप्रमाणेच आम्हा सर्व साधकांनाही कृतज्ञताभावात रहाता येऊ दे’, अशी आपल्या चरणी आर्ततेने अन् शरणागतभावाने प्रार्थना करते.’
– श्रीमती मनीषा गाडगीळ (प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके यांची मुलगी) (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१२.२०२१)