‘बोरोसिल लिमिटेड’च्या श्रीमती किरण खेरूका (वय ८९ वर्षे) यांची सनातनच्या पनवेल, देवद येथील आश्रमाला सदिच्छा भेट !

मुंबई – ‘बोरोसिल लिमिटेड’च्या श्रीमती किरण खेरूका यांनी सनातनच्या पनवेल येथील देवद आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासमवेत त्यांच्या नातेवाईक श्रीमती उषा शर्मा, तसेच सनातनच्या साधिका श्रीमती ललिता गोडबोले यासुद्धा उपस्थित होत्या.

१. सनातन संस्थेच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या जनसंपर्क आणि विज्ञापन प्रसारसेविका श्रीमती स्मिता नवलकर या श्रीमती खेरूका यांच्या वर्ष २००० मध्ये प्रथम संपर्कात आल्या. तेव्हापासून त्या सनातन संस्थेच्या धर्मकार्यात पंचांग, वह्या, विज्ञापने, सनातन निर्मित ग्रंथ आदी प्रायोजित करणे, तसेच विविध प्रकारचे अर्पण देणे या माध्यमांतून संस्थेच्या कार्यात सहभागी आहेत.

२. श्रीमती खेरूका यांची अनेक दिवस सनातनच्या आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. श्रीमती खेरूका आश्रम पहातांना म्हणाल्या, ‘‘मी इथे यायला पुष्कळ विलंब केला आहे. निदान आयुष्याच्या शेवटी तरी मला आश्रमाचे दर्शन झाले. हे मी माझे भाग्य समजते.’’

३. त्यांच्यासमवेत आलेल्या श्रीमती उषा शर्मा म्हणाल्या, ‘‘मला येथे येऊन पुष्कळ चांगले वाटले. कधी संधी मिळाली आणि येथे येऊन सेवा करायला मिळाली, तर ते माझे अहोभाग्य असेल. मी आश्रमदर्शन करून कृतार्थ झाले. मी याविषयी इतरांनाही सांगीन.’’

श्रीमती खेरूका यांचा सनातनच्या आश्रमाविषयीचा अभिप्राय

आश्रमातील स्वच्छता, साधकांचा सेवाभाव आणि त्यांची नम्रता पाहून मी भारावून गेले. आश्रमातील महाप्रसाद ग्रहण केल्यावर तृप्ती अनुभवली. आश्रमाची शुद्धता मनात एक प्रकारची श्रद्धा निर्माण करते. मला विश्वास आहे की, आमचा सनातन धर्म सदा जीवित राहील. आज सत्तेसाठी नेत्यांनी राष्ट्र आणि धर्म यांचा बाजार मांडला आहे. ईश्वरचरणी प्रार्थना आहे की, अशांना सद्बुद्धी लाभू दे.