राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवडणूक शपथपत्रातील माहितीत तफावत आढळल्याने न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश !

अब्दुल सत्तार

याचिकाकर्त्यांचे अब्दुल सत्तार यांच्यावर नेमके आरोप काय ?

१. वर्ष २०१४ च्या शपथपत्रात दहेगावातील भूमी ५ लाख ६ सहस्र रुपयांत खरेदी केल्याचे दाखवले. वर्ष २०१९ मध्ये हा व्यवहार २ लाख ७६ सहस्र २५० रुपयांत दाखवला आहे.

२. वर्ष २०१४ च्या शपथपत्रात सिल्लोड येथील सर्व्हे क्रमांक ९०/२ ची व्यावसायिक इमारत ४६ सहस्र रुपयांत खरेदी केली होती. वर्ष २०१९ मध्ये खरेदी मूल्य २८ सहस्र ५०० रुपये दाखवले आहे.

३. वर्ष २०१४ मध्ये निवासी इमारतीचे खरेदी मूल्य ४२ लाख ६६ सहस्र रुपये दाखवले आहे, तर वर्ष २०१९ मध्ये ही किंमत १० सहस्र रुपये आहे.

४. वर्ष २०१४ मध्ये सर्व्हे क्रमांक ३६४ मधील इमारत १६ लाख ५३ सहस्र रुपये दाखवली आहे. वर्ष २०१९ मध्ये याची किंमत १ लाख ६५ सहस्र रुपये आहे.

५. प्रतिज्ञापत्रात बंधपत्रे, ऋणपत्रे, शेअर्स आणि आस्थापने यांतील गुंतवणुकीची माहिती दिलेली नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी, प्रलंबित आणि शिक्षित केलेल्या खटल्यांची, तसेच दिवाणी वादासंदर्भातील माहिती दिली नाही.

संभाजीनगर – जिल्ह्यातील सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या निवडणूक शपथपत्रातील माहितीमध्ये तफावत आढळल्याने सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी याची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना १६ फेब्रुवारी या दिवशी दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी यासंबंधी याचिका प्रविष्ट केली होती.

‘वर्ष २०१४ मध्ये अब्दुल सत्तार हे काँग्रेस, तर वर्ष २०१९ मध्ये शिवसेनेकडून आमदार झाले आहेत. त्यांनी वर्ष २०१४ आणि वर्ष २०१९ च्या शपथपत्रात खोटी अन् दिशाभूल करणारी माहिती दिली आहे’, अशी तक्रार पुणे येथील डॉ. अभिषेक हरदास आणि सिल्लोड येथील महेश शंकरपेल्ली यांनी २७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी सिल्लोड येथील न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मीनाक्षी धनराज यांनी भारतीय दंड विधान संहिता कलम २०२ अन्वये सिल्लोड पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी चौकशी करून अहवाल सादर करावा, असा आदेश दिला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी २२ मार्च या दिवशी होणार आहे.

शपथपत्राची नोटरी शासन प्राधिकृत नोटरी अधिकारी अधिवक्ता एस्.के. ढाकरे यांनी केली. परवान्याचे नूतनीकरण केलेले नसतांना नोटरी केल्याने ते फसवणुकीत सहभागी आहेत. यामुळे याचिकेत त्यांचाही समावेश आहे. सत्तार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.