नियमितपणे अग्निहोत्र करणारे साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यासाठी सूचना !

‘जे नियमितपणे अग्निहोत्र करतात त्यांनी अग्निहोत्रात हीना अत्तर किंवा गुग्गुळ यांची आहुती द्यावी आणि ही सामुग्री उपलब्ध नसल्यास तुळशीची किमान ५ पाने किंवा किमान १ चमचा देशी गायीचे गोमूत्र किंवा कापराच्या ४ – ५ वड्या यांची आहुती द्यावी !

१. अग्निहोत्र करत असतांना ‘हीना’ अत्तराची आहुती दिल्यावर सूक्ष्म स्तरावर होणारा परिणाम

‘हीना’ अत्तरामध्ये श्रीमहालक्ष्मीदेवीची तारक शक्ती कार्यरत असते. अग्निहोत्र करत असतांना हीना अत्तराची आहुती दिल्यामुळे अत्तरातील आपमय घटकांचे विघटन होऊन त्यांचे रूपांतर सुगंधी धुरामध्ये होते. या सुगंधामध्ये प्राणशक्तीच्या गंधमय लहरी आणि धुरामध्ये प्राणशक्तीचे मूळ वायूरूप कार्यरत होते. त्यामुळे ‘हीना’ अत्तराची आहुती दिल्यावर होमातून येणारा सुगंधी धूर श्वासावाटे व्यक्तीच्या देहात गेल्यावर चैतन्यदायी सुगंधी वायूलहरींमुळे त्यांच्या श्वसनमार्गातील अडथळे दूर होतात आणि त्यांची प्राणशक्ती वाढण्यास साहाय्य होते.

२. अग्निहोत्र करत असतांना गुग्गुळ धुपाची आहुती दिल्यावर दत्ततत्त्व आणि देवीतत्त्व कार्यरत होणे

गुग्गुळामध्ये देवी आणि दत्त यांचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. होमात गुग्गुळ धुपाची आहुती दिल्यावर गुग्गुळाच्या सुगंधातून वातावरणात दत्ततत्त्वाच्या गंधलहरी प्रक्षेपित झाल्यामुळे व्यक्तीच्या सूक्ष्म कोशांची शुद्धी होऊन तिची सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमता वाढते. त्याचप्रमाणे होमातील गुग्गुळ धुपाच्या सात्त्विक धुराकडे वास्तू आणि तिच्या सभोवतालचे वातावरण यांतील रज-तम प्रधान त्रासदायक (काळ्या) शक्तींच्या लहरी आकृष्ट होतात अन् गुग्गुळातील देवीतत्त्वामुळे या त्रासदायक शक्तीच्या लहरींचे विघटन होते. त्यामुळे वास्तूत रहाणार्‍या व्यक्तीला सूक्ष्मातून विविध प्रकारचे शारीरिक आणि मानसिक स्तरांवर त्रास देणार्‍या वाईट शक्तींचा नाश होऊन व्यक्तीला शारीरिक अन् मानसिक आरोग्य लाभते.

कु. मधुरा भोसले

३. ज्यांच्याकडे हीना अत्तर किंवा गुग्गुळ धूप उपलब्ध नसेल त्यांनी अग्निहोत्र करत असतांना त्यात तुळशीची किमान ५ पाने किंवा किमान १ चमचा देशी गायीचे गोमूत्र यांची आहुती द्यावी !

३ अ. तुळशीच्या पानांची आहुती दिल्यावर सूक्ष्म स्तरावर होणारा लाभ : तुळशीच्या पानांमध्ये विष्णुतत्त्व आणि प्राणशक्ती पुष्कळ प्रमाणात असते. त्यामुळे अग्निहोत्र करत असतांना तुळशीच्या किमान ५ पानांची आहुती दिल्यावर वातावरणात धुराच्या रूपातील विष्णुतत्त्वमय वायुलहरी आणि प्राणशक्तीयुक्त दैवी सुगंध दरवळतो. विष्णुतत्त्वमय वायुलहरींमुळे वास्तूची शुद्धी होते. प्राणशक्तीयुक्त दैवी सुगंधाच्या लहरींमुळे वास्तूत रहाणार्‍या व्यक्तींची प्राणशक्ती वाढते.

३ आ. गोमूत्राची आहुती दिल्यावर सूक्ष्म स्तरावर होणारा लाभ : गोमूत्रातील मारक शक्तीमुळे वास्तुतील आणि तिच्या सभोवतालच्या वातावरणातील जंतूंचा नाश होतो. अशा प्रकारे तुळशीची पाने आणि गोमूत्र यांची आहुती अग्निहोत्राच्या होमात दिल्यामुळे वास्तूची शुद्धी होऊन वास्तूच्या भोवती सूक्ष्मातून संरक्षककवच निर्माण होते.

३ इ. कापराची आहुती दिल्यावर सूक्ष्म स्तरावर होणारा लाभ : कापरामध्ये शिवतत्त्व असल्यामुळे अग्निहोत्राच्या होमात कापराच्या वड्यांची आहुती दिल्यावर त्यातून शिवतत्त्वमय तारक-मारक शक्ती आणि चैतन्य यांच्या लहरी वायुमंडलात प्रक्षेपित होतात. त्यामुळे वास्तूची शुद्धी होऊन वास्तूच्या भोवती सूक्ष्मातून संरक्षककवच निर्माण होते.

४. अग्निहोत्राच्या होमात हीना, गुग्गुळ, तुळशीपत्र किंवा गोमूत्र किंवा कापूर यांच्या आहुती दिल्यावर विविध स्तरांवर होणारे लाभ

अग्निहोत्राच्या होमात हीना, गुग्गुळ, तुळशीपत्र किंवा गोमूत्र किंवा कापूर यांच्या आहुती दिल्यावर होमातून येणारा सुगंध हुंगावा आणि दीर्घ श्वास घेऊन हा धूर अधिकाधिक घेण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे शरिरात श्वासावाटे गेलेल्या औषधी धुराचा लाभ केवळ शारीरिक स्तरावरच नव्हे, तर आध्यात्मिक स्तरावरही पुष्कळ प्रमाणात होतो. त्यामुळे व्यक्तीला होणारे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरांवरीलही त्रास नष्ट होण्यास साहाय्य होते.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.