‘सनातनचे प्रत्येक अभियान आणि उपक्रम यांना देव भरभरून प्रतिसाद देत असल्याने साधकांनी ‘प्रतिमा जपणे’ यांसह अन्य स्वभावदोषांना बळी न पडता अधिकाधिक लोकांना संपर्क करावा !’ – सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

‘सध्या सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ज्ञानशक्ती (ग्रंथ) प्रसार अभियान, धान्य अर्पण अभियान, मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करणार्‍या सनातनच्या आश्रमांना धर्मदान करणे, यांसह पुढील शैक्षणिक वर्षासाठी वह्यांची मागणी मिळवणे, गुढीपाडवा शुभेच्छापत्र मागणी मिळवणे, असे अनेक उपक्रम एकाच वेळी चालू असूनही समाजातील व्यक्तींकडून या उपक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांना मोठ्या प्रमाणात यशही मिळत आहे.

या उपक्रमांसाठी समाजातील व्यक्तींना संपर्क केल्यावर ‘ते आपली वाट पहात आहेत’, असे लक्षात येते. याउलट ‘साधक समाजात जाऊन अर्पण मागण्यास आणि प्रायोजक मिळवण्यास टाळाटाळ करत आहेत’, असे लक्षात येत आहे. साधकांतील ‘प्रतिमा जपणे’ हा अहंचा पैलू प्रबळ असल्याने ते समाजात जाऊन अर्पण मागण्यास टाळाटाळ करत आहेत.

साधकांनी प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे, ‘आपण समाजातील व्यक्तींना काहीतरी देण्यासाठीच जात आहोत. समाजातील जे लोक धर्मकार्यासाठी अर्पण देतात, त्यांना त्या अर्पणाच्या माध्यमातून उद्धारण्यासाठी देवानेच ती संधी दिलेली असते. त्यामुळे विविध उपक्रमांच्या माध्यमातून धर्मकार्यात सहभागी झाल्याने समाजातील व्यक्तींना लाभच होत असतो. देव कुणाचे फुकट घेत नाही आणि कुणाला फुकट देत नाही. भगवान श्रीकृष्ण आपल्याला भरभरून देत असल्याने साधकांनी ‘प्रतिमा जपणे’, तसेच अन्य कोणत्याही स्वभावदोषांना बळी न पडता लोकांना संपर्क करून ‘ते धर्मकार्यात अधिकाधिक सहभागी कसे होतील ?’, यासाठीच प्रयत्न करणे अपेक्षित आहे.’

– सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था