आश्वासन देऊनही साडेचार वर्षांत दवाखान्याची निर्मिती न केल्यामुळे नागरिक संतप्त !
नाशिक – आगामी होणार्या येथील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून प्रारूप आराखडा अंतिम झालेला नसतांना आणि निवडणुकीची उमेदवारी मिळालेली नसतांनाही अनेक जण प्रचारासाठी मतदारांच्या घरी जात आहेत. त्यातच शहरातील प्रभाग क्रमांक २७ मधील शिवसेनेचे नगरसेवक चंद्रकांत खाडे यांनी येथील चुंचाळे घरकुल योजनेच्या ठिकाणी गेले होते, त्या वेळी नागरिकांनी ‘आमच्या प्रभागात आश्वासन देऊनही तुम्ही दवाखाना का केला नाही ?’ असे विचारून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. त्यामुळे त्यांनी तेथून काढता पाय घेतला.
खाडे यांनी चुंचाळे घरकुल योजनेत दवाखान्यासाठी आरक्षित ठेवलेल्या भूमीची पहाणी केली. येथे तात्पुरत्या स्वरूपात दवाखाना चालू करण्याचा मनोदयही त्यांनी या पहाणीत व्यक्त केला; मात्र बराच वेळ नगरसेवकांचे म्हणणे ऐकूण घेणार्या नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यांनी खाडे यांच्यावर एकामागून एक प्रश्नांच्या फैरी झाडल्या. ‘निवडणूक होऊन साडेचार वर्षे झाली असून तुम्ही इतके दिवस कुठे होता ?’, ‘तुम्ही चाडेचार वर्षांपूर्वी दवाखान्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तुम्ही इकडे आलाच नाही. निवडून आले म्हणजे तुमचे काम संपले का ?’, ‘साडेचार वर्षांमध्ये तुम्हाला दवाखान्याची आठवण का आली नाही ?’, असे प्रश्न विचारल्यानंतर खाडे गोंधळून गेले. त्यांच्याकडे या प्रश्नांची उत्तरे नव्हती.
नागरिकांनी इतका संताप व्यक्त केल्यानंतरही नगरसेवक खाडे यांनी स्पष्टीकरण दिल्यावर नागरिकांच्या संतापाचा पारा वाढला. ‘महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला आता काम आठवले का ?’, असा प्रश्न नागरिकांनी विचारला.