सर्वोच्च न्यायालयाने नीतेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

शरण येण्यासाठी १० दिवसांचा अवधी

भाजपचे आमदार नितेश राणे

नवी देहली – सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख आणि शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्यासाठी १० दिवसांचा अवधी दिला आहे. शरण आल्यानंतर नीतेश राणे नियमित जामिनासाठी अर्ज करु शकतात.

यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात गेले असता तेथेही त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.

काय आहे प्रकरण ?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख आणि शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर या दिवशी कणकवली येथे आक्रमण करण्यात आले. संतोष परब यांच्यावर जीवघेणे आक्रमण करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी देहली येथून अटक केली. अन्वेषणाच्या वेळी त्याने नीतेश राणे यांचे नाव घेतले होते. या प्रकरणी नीतेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशीही करण्यात आली.

काय आहे मारहाण झालेले संतोष परब यांचा आरोप ?

संतोष परब यांनी त्यांनी आरोप करतांना म्हटले की, दुचाकीवर असतांना मला जोरात एका गाडीने धडक देत आक्रमण केले. ती धडक इतकी जोरात होती की, त्यामुळे मी रस्त्याच्या बाजुला फरफटत गेलो. माझ्या हाताला जखमही झाली आहे. फरफटत जाऊन मी एका बाजूला पडलो होतो आणि माझी दुचाकी माझ्या पायावर पडलेली होती. धडक देणारे  ‘इनोव्हा’ हे चंदेरी रंगाचे वाहन होते. ते पुढे २० ते २५ फुटांवर जाऊन थांबले. त्यातील एक व्यक्ती माझ्याजवळ आली आणि तिने ‘गोट्या सावंत, नीतेश राणे यांना कळवले पाहिजे’, असे म्हणत खिशातून मोबाईल काढला.