आचरा बंदर येथे मत्स्यव्यवसाय अधिकारी आणि सागरी सुरक्षारक्षक यांच्यावर प्राणघातक आक्रमण

अनधिकृतपणे मासेमारी करणार्‍यांनी आक्रमण केल्याचा संशय

मालवण – तालुक्यातील आचरा बंदर येथे अनधिकृत मासेमारी करणार्‍यांवर कारवाई करण्यास गेलेले मत्स्य अधिकारी आणि सागरी सुरक्षारक्षक यांना २१ जानेवारीच्या रात्री बंदर जेटीवर मारहाण करण्यात आली. ही मारहाण अनधिकृतपणे यांत्रिक नौकांद्वारे (पर्ससीन) आणि प्रकाश झोतात (एल्.ई.डी.द्वारे) मासेमारी करणार्‍या व्यावसायिकांनी केल्याची चर्चा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करणार आहोत, अशी माहिती ‘नॅशनल फिश वर्कर्स फोरम’चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य चिंतामणी तोरसकर यांनी दिली. (सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासकीय यंत्रणेवर अवैध व्यवसाय करणारे प्राणघातक आक्रमण करत असतील, तर त्यांची मजल एवढ्यापर्यंत कशी गेली ? याचा शोध घेऊन मुळावर घाव घालणे आवश्यक आहे. – संपादक)

आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार ! – अस्लम शेख, मत्स्यव्यवसाय मंत्री, महाराष्ट्र

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अधिनियम – २०२१ ची कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व सागरी जिल्ह्यांच्या साहाय्यक मत्स्य आयुक्तांना दिले आहेत. कायद्याची कार्यवाही करत असतांना अवैध मासेमारी करणार्‍यांकडून अधिकारी आणि सागरी सुरक्षारक्षक यांच्यावर आक्रमण होणे अत्यंत निषेधार्ह आहे. या घटनेची गांभीर्याने नोंद घेतली असून अधिकार्‍यांवर आक्रमण करणार्‍यांची गय केली जाणार नाही. आक्रमणकर्त्यांवर वेळीच वचक बसावा, यासाठी गुन्हे नोंद करून कठोरात-कठोर कारवाई करणार असल्याची चेतावणी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

कथित आक्रमणाच्या प्रकरणात ‘पर्ससीन’धारक मासेमारांना गोवण्याचा प्रयत्न चालू आहे !

मालवण – यांत्रिक नौकांद्वारे (पर्ससीन) मासेमारी करणार्‍या मासेमारांच्या मागण्या मान्य झाल्या, तर काही जणांची नेतेगिरी संपुष्टात येईल, अशी भीती वाटत असल्याने ‘पर्ससीन’ नौकाधारकांना अडचणीत आणण्यासाठी कथित आक्रमणाच्या प्रकरणात त्यांना गोवण्याचा प्रयत्न चालू आहे. जेणेकरून ‘पर्ससीन’धारकांच्या १ जानेवारीपासून येथील मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर चालू असलेल्या उपोषणाची धार अल्प होण्यासह त्याची अपकीर्ती होईल, यासाठी हे सर्व प्रयत्न चालू आहेत, असा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा रापणकार असोशिएशनचे अध्यक्ष अशोक सारंग यांनी केला आहे.