ग्रीसच्या २ धर्मगुरूंकडून ‘राफेल’ या लढाऊ विमानांची पूजा !

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेलची पूजा केल्यावर त्यांची खिल्ली उडवणारे आता ग्रीसच्या धर्मगुरूंनी केलेल्या पारंपरिक पूजेविषयी तोंड उघडतील का ? – संपादक

डावीकडे ग्रीक धर्मगुरूं आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

नवी देहली – भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारताने फ्रान्सकडून खरेदी केलेल्या ‘राफेल’ या लढाऊ विमानांच्या नव्या ताफ्याची फ्रान्समध्ये जाऊन पूजा केली होती. त्यावरून त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. आता फ्रान्सने ग्रीसला ४ राफेल विमाने दिली आहेत. त्या ताफ्याची ग्रीकच्या धर्मगुरूंनी पूजा केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात २ धर्मगुरू त्यांच्या पारंपरिक वेषात विमानतळावर येतात आणि मंत्र म्हणत त्या विमानांची पूजा करतात, तसेच पाणी शिंपडून वैमानिकांना आशीर्वाद देतात, तेच पाणी ते विमानांवरही शिंपडतात. त्या विमानतळावर अनेक लोक हा सोहळा पहाण्यासाठी उपस्थित असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहेे. या वेळी वैमानिकही धर्मगुरूंच्या हाताचे चुंबन घेतात, तेव्हा हे धर्मगुरू त्यांच्याकडील पवित्र पाणी त्यांच्या डोक्यावर शिंपडतात, असेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

३६ राफेल विमानांच्या ताफ्यातील काही विमाने भारताला देण्यात आली होती, तेव्हा राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये त्या विमानांची पूजा केली होती. टिळा लावून, फुले वाहिली होती. चाकाखाली लिंबू ठेवले होते. नारळ वाढवला होता. त्या वेळी काँग्रेसचे संसदेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी याला ‘तमाशा’ असे संबोधले होते. राष्ट्र्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजनाथ सिंह यांची तुलना स्वतःच्या गाडीच्या रक्षणासाठी लिंबू-मिरची अडकवणार्‍या ट्रकचालकाशी केली होती.