साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !
भारतात मार्च २०२० पासून वैश्विक महामारी असलेल्या ‘कोविड’ने थैमान घातले आहे. मागील वर्षभरात याचा संसर्ग पसरण्यास रुग्णांच्या दृष्टीने पुढील दोन प्रमुख कारणे असल्याचे लक्षात येते.
१. सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, समारंभामध्ये सहभागी न होणे इत्यादी मूलभूत गोष्टी अनेक वेळा माध्यमांतून सांगूनही व्यक्तीचे गांभीर्य न्यून पडते अन् अनेकांकडून निष्काळजीपणे वागणे होते.
२. औषधोपचार घेण्यात विविध माध्यमांमधून प्रबोधन होत असूनही रुग्ण आजाराची लक्षणे स्वत:मध्ये आढळल्यास ती जाणीवपूर्वक लपवून ठेवतात. वेळेवर औषधोपचार घेत नाहीत. त्यामुळे विषाणूचा संसर्ग बळावत जाऊन रुग्णांना जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आढळत आहेत.
साधकांनी या दोन्ही चुका टाळून सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, कणकण, ताप, वास न येणे, जुलाब होणे, थकवा, भूक न लागणे यांसारखी कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने औषधोपचार घेणे आवश्यक आहे.
कोरोनावर यशस्वी उपचार केलेल्या डॉक्टरांकडून औषधोपचार घेण्यास प्राधान्य द्या !
आपल्या भागात कोरोनावर यशस्वी उपचार केलेले ॲलोपॅथी डॉक्टर, आयुर्वेदातील वैद्य किंवा होमिओपॅथी डॉक्टर असल्यास त्यांच्याकडून औषधोपचार घेण्यास प्राधान्य द्यावे. याची माहिती न मिळाल्यास जवळच्या डॉक्टरांना दाखवून उपचार चालू करावेत. डॉक्टरांनी सांगितलेल्या आवश्यक चाचण्याही करून घ्याव्यात. डॉक्टरांपासून कोणतीही लक्षणे लपवू नयेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या आरोग्याचा आढावा वेळोवेळी द्यावा. उपचार चालू असूनही रोगाची तीव्रता वाढत असेल, तर आवश्यक वाटल्यास दुसर्या डॉक्टरांचे किंवा वैद्यांचे मत घ्यावे आणि तारतम्याने रुग्णालयात भरती होण्याविषयी निर्णय घ्यावा. स्वतःच्या मनाने, तसेच पुस्तके किंवा सामाजिक माध्यमांतील ‘पोस्ट’ वाचून स्वतःच्या स्तरावर केलेल्या उपचारांवर विसंबून राहू नये.
सतर्क राहून उपचार करणे आवश्यक !
कोरोनाबाधित ८५ टक्के रुग्ण त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे बरे होतात, तर केवळ १५ टक्के रुग्ण पुढच्या टप्प्यात जातात, असे आतापर्यंतचे सार्वत्रिक निरीक्षण आहे. असे असले, तरी १५ टक्के कोण ? हे आधी कुणीच सांगू शकत नाही. यामुळे या रोगासंदर्भात निष्काळजी न रहाता लवकरात लवकर उपचार चालू करावेत. कोरोनाबाधित व्यक्ती बरे होण्याचे प्रमाण पुष्कळ अधिक असल्याने या रोगाला घाबरू नये; परंतु सतर्क रहावे.
जन्म-मृत्यू हे प्रारब्धानुसार असले, तरी जीविताच्या रक्षणासाठी वेळीच योग्य क्रियमाण वापरणे, ही आपली साधना आहे, हे लक्षात घेऊन कृती करावी !
– डॉ. पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.