शाळा महाविद्यालयांतून युवक आणि युवती कृतीशील होणे !
पुणे – जिल्ह्यात १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत भारतीय संस्कृतीनुसार नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच साजरे करावे याविषयीची चळवळ राबवण्यात आली होती. या उपक्रमाला सर्वच स्तरांतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. हिंदु जनजागृती समितीने राबवलेल्या या प्रबोधन मोहिमेत समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये प्रबोधनात्मक व्याख्याने, ठिकठिकाणी फलक प्रसिद्धी, तसेच रिक्क्षावरील प्रबोधन फलक यांच्या माध्यमांतून जागृती करण्यात आली. त्यालाही विशेष प्रतिसाद लाभला.
३१ डिसेंबरच्या कालावधीत तरुणांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता एक गंभीर समस्या ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी गेल्याने भारतीय संस्कृतीचा र्हास होत आहे. ३१ डिसेंबरच्या कालावधीत तरुणांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता ही एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे तरुणांनी भारतीय संस्कृतीनुसार नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच साजरे करावे. युवावर्गाने स्वरक्षण प्रशिक्षण शिकून राष्ट्ररक्षणाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी केले. नर्हे (जिल्हा पुणे) येथील ‘डॉ. सुधाकरराव जाधवर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज’मध्ये विविध विभागांत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी २३ ते २६ डिसेंबर या ४ दिवसांच्या कालावधीत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.
या व्याख्यानांचा इयत्ता ११ वी, १२ वी आणि तृतीय वर्षाच्या वाणिज्य शाखेचे विद्यार्थी, ‘पॅराडाईज इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’ मधील इयत्ता ११ वी आणि १२ वीचे विद्यार्थी, महाविद्यालयातील बी.कॉम.च्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षात शिकणारे विद्यार्थी, नर्सिंग इन्स्टिट्यूट मधील ३४९ विद्यार्थी आणि १८ शिक्षक यांनी लाभ घेतला. यासमवेतच आंबेगाव पठार (पुणे) येथील ज्ञान प्रसारक विद्या मंदिर मधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठीही व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ७४ विद्यार्थी, ५ शिक्षक उपस्थित होते. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीनुसार आचरण करण्याचा दृढ निश्चय केला.
वैशिष्ट्यपूर्ण
‘डॉ. सुधाकरराव जाधवर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज’मध्ये लाभलेला विशेष प्रतिसाद !
१. ‘डॉ. सुधाकरराव जाधवर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज’च्या मुख्याध्यापिका म्हणाल्या की, तुम्ही योग्य पद्धतीने विषय सांगितला आणि प्रबोधन केले. काल मी अनुपस्थित असल्याने विषय ऐकता आला नाही; मात्र मला विद्यार्थ्यांनी दूरभाष करून सांगितले. त्यामुळे विषय समजला.
२. सध्याच्या काळानुसार स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचे महत्त्व आणि समितीच्या वतीने घेण्यात येणार्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाविषयी माहिती सांगितल्यावर विद्यार्थ्यांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याची इच्छा व्यक्त करून नावनोंदणीही केली. त्या ठिकाणी त्वरित शौर्य जागृती व्याख्यानही घेण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांसाठी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गही चालू करण्यात आला आहे.
३. महाविद्यालयातील काही युवतींना व्याख्यानानंतर दूरभाष केला असता त्यांनी ‘हॅलो’ ऐवजी ‘नमस्कार’ म्हणण्यास प्रारंभ केला आहे, असे लक्षात आले.
आंबेगाव पठार (पुणे) ज्ञान प्रसारक विद्या मंदिरात मुख्याध्यापकांनी समितीच्या कार्याचे कौतुक करून केला सन्मान !
१. आंबेगाव पठार येथील ज्ञान प्रसारक विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून जागृती केल्याविषयी मुख्याध्यापकांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.
२. विद्यामंदिरात विद्यार्थ्यांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी नावनोंदणीही केली.
३. व्याख्यानाला उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी यापुढे भारतीय संस्कृतीनुसारच आचरण करण्याचा आणि नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच साजरे करण्याचा निर्धार केला.
४. ‘अन्य व्याख्यानांच्या तुलनेत या वेळी विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा विषय गोंधळ न करता शांतपणे ऐकून घेतला’, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापकांनी समितीच्या कार्यकर्त्यांकडे व्यक्त केली.