ढवळी, फोंडा येथील गोवा मुक्तीलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक गोविंद प्रभु चिमुलकर यांचा गोवा मुक्तीदिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान !
फोंडा – भगवतीकृपा सोसायटी, ढवळी, फोंडा येथे रहाणारे स्वातंत्र्यसैनिक श्री. गोविंद पुरुषोत्तम प्रभु चिमुलकर (वय ९० वर्षे) यांचा १९ डिसेंबर २०२१ या दिवशी पणजी येथील गोवा मुक्तीच्या ६० व्या वर्धापनदिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
स्वातंत्र्यसैनिक श्री. गोविंद प्रभु चिमुलकर हे ऐन तारुण्यात स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले होते. त्यांचा जन्म २२ ऑगस्ट १९३१ या दिवशी डिचोली, गोवा येथे झाला. लहानपणी घरातील भक्तीपूर्ण आणि संस्कारी वातावरण अन् त्यात चालू झालेली गोवा मुक्तीची चळवळ यांमुळे त्यांचा स्वभाव शिस्तवद्ध आणि करारी होता. हाती घेतलेले काम दायित्वाने पूर्ण करण्याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. गोवा सोडून ते मुंबईला गेले आणि तेथे गोवा मुक्तीलढ्यात एक सत्याग्रही म्हणून सक्रीय सहभाग घेतला. वर्ष १९५५ मध्ये ते इब्रामपूर-हेदूस येथे ते पहिल्यांदा सत्याग्रहात सहभागी झाले. आदल्या दिवशी पोर्तुगीज पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघा जणांचे बळी गेले होते. अशा पार्श्वभूमीवर मोठे धाडस दाखवत दुसर्या दिवशी झालेल्या सत्याग्रहात श्री. चिमुलकर यांनी भाग घेतला. या वेळी पोतुगीज सैनिकांनी काही सत्याग्रहींना अत्यंत घायाळ अवस्थेत काटेरी जंगलात फेकून दिले होते. मुंबईहून चांगल्या आस्थापनातील (कंपनीतील) नोकरी सोडून आलेल्या चिमुलकरांचा यामध्ये समावेश होता. प्रकृती सुधारल्यावर ते पुन्हा गोवा मुक्ती चळवळीत सक्रीय झाले. भूमीगत राहून कार्य करतांना पोतुगिजांविरुद्ध पत्रके वाटणे, संदेश अनेकांपर्यंत पाचवणे आदी कामे ते करत असत. या कामांचा सुगावा पोर्तुगिजांना लागल्यावर वर्ष १९५६ मध्ये त्यांना अटक झाली. साडेसात महिन्यांची शिक्षा भोगल्यावर त्यांची सुटका झाली. सुटका झाल्यावर ते पुन्हा मुंबईला गेले.
श्री. चिमुलकर यांनी पुढे गोव्यात येऊन वास्को येथे चौगुले आस्थापनात नोकरी स्वीकारली. तेथे काम करत असतांनासुद्धा त्यांनी भूमीगत राहून आणि सांस्कृतिक कार्यकमांद्वारे मुक्ती चळवळीचे कार्य चालू ठेवले. मुक्ती चळवळीतील त्यांच्या अनमोल योगदानासाठी स्वातंत्र्यसैनिक म्हणून सरकारच्या वतीने ताम्रपट देऊन त्यांचा १८ जून १९९५ या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ९ ऑगस्ट २००८ या दिवशी नवी देहली येथे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.