चेन्नई (तमिळनाडू) – शिवसेनेचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष श्री. राधाकृष्णन् यांच्यासह इतर सदस्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ए.एन्.आय. या वृत्तसंस्थेशी बोलतांना श्री. राधाकृष्णन म्हणाले, ‘‘मी ३१ वर्षे शिवसेनेत होतो. गेल्या २५ वर्षांपासून मी शिवसेनेच्या नावाने कल्याणकारी योजनांमध्ये योगदान दिले आहे. शिवसेना आणि भाजप हे शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमवेत स्वाभाविक युतीचे भागीदार होते; पण आता त्यांची जागा सोनिया गांधी यांची काँग्रेस आणि द्रमुक यांनी घेतली आहे. हे आम्हाला रूचलेले नाही.
ते अध्यात्मविरोधी, राष्ट्रवादविरोधी आणि हिंदीविरोधी आहेत. आम्ही काँग्रेस आणि द्रमुक यांच्या हाताखाली काम करू शकत नाही. शिवसेनेच्या वरिष्ठांना हे ठाऊक आहे की, आम्ही निराश आहोत. त्यामुळे आतापासून मी भाजपचा माणूस आहे, शिवसेनेचा नाही.’’