महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली !

पेपरफुटी प्रकरणी पुणे सायबर सेलची कारवाई

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करतांना पोलीस

पुणे – पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. सायबर सेलने तुकाराम सुपे यांना १६ डिसेंबर या दिवशी चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर रात्री विलंबाने त्यांना अटक करण्यात आली. शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.

परीक्षार्थींची आर्थिक फसवणूक झाल्याची तसेच परीक्षेत घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती समाजमाध्यमांद्वारे दिली होती. त्यानुसार आव्हाड आणि म्हाडाच्या अधिकार्‍यांनी चौकशी केली असता यात घोटाळा असल्याचे उघड झाले. त्यानुसार सायबर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि पेपरफुटीचा प्रयत्न हाणून पाडला होता.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील अपप्रकार उघड झाल्यानंतर सर्व परीक्षा रहित कराव्या लागल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांकडून कंत्राटदार आस्थापनाच्या संचालकांसह ६ जणांना अटक करण्यात आली होती. भरती परीक्षेच्या कामाचे कंत्राट मिळालेल्या ‘जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस’ या आस्थापनानेच पेपरफुटीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आस्थापनाचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुख यांचाही समावेश होता.