ठाणे, १६ डिसेंबर (वार्ता.) – भिवंडी तालुक्यातील दैनिक ‘स्वराज्य तोरण’चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव डॉ. किशोर पाटील यांना त्यांनी केलेल्या कार्याविषयी ‘जीवन गौरव २०२१’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. नवी देहली येथील केंद्रीय मानवाअधिकार संघटन यांच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद दहीवले यांच्या हस्ते मानवाअधिकार दिवसाचे औचित्य साधून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
भिवंडी तालुक्यातील शेतकरी दांपत्याचे सुपुत्र डॉ. किशोर बळीराम पाटील हे गेली २७ वर्षे पत्रकारिता करत असून ते ‘स्वराज्य तोरण’ या दैनिकाचे संपादक आहेत. ते महाराष्ट्र शासनाचे अधिस्विकृतीधारक पत्रकार असून महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्यस्तरीय सदस्य आहेत, तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस असून ते शासकीय समित्यांवर सदस्य आहेत. ते मागील १४ वर्षे पत्रकारिता करत आहेत. त्यांनी त्यांच्या लेखणीतून सामाजिक बांधिलकी जपत निष्पक्षपाती राहून सर्व समाजबधावांच्या अनेक समस्या सोडवत त्यांना न्याय मिळवून दिला आहे. कोरोनाच्या काळातही त्यांनी पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना साहाय्य केले आहे. विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्याविषयी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. राज्यातील पत्रकार संघटना, तसेच भिवंडी येथील कैलास नगर ग्रामस्थ मंडळ यांनी पाटील यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.