(म्हणे) ‘सत्तेवर आल्यास ‘गृहलक्ष्मी’ योजना चालू करून कुटुंबप्रमुख महिलेला प्रतिमास ५ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देणार !’

तृणमूल काँग्रेसचे निवडणुकीच्या तोंडावर महिलांना भुरळ पाडणारे आश्‍वासन

महिलांना स्वावलंबी, स्वाभिमानी आणि सक्षम न बनवता त्यांना आमिषे दाखवून कमकुवत बनवणारे राजकीय पक्ष !

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा

पणजी, ११ डिसेंबर (वार्ता.) – तृणमूल काँग्रेसने भाजपच्या ‘गृहआधार’ योजनेला पर्याय देतांना त्यापेक्षा अधिक म्हणजेच प्रतिमास ५ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देणारी ‘गृहलक्ष्मी’ योजना चालू करण्याचे आश्‍वासन दिले आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘कुटुंबाच्या महिला प्रमुखाला प्रतिमास ५ सहस्र रुपये म्हणजेच प्रतिवर्ष ६० सहस्र रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणुकीपूर्वीच ‘गृहलक्ष्मी’ योजनेचे ‘कार्ड’ सर्व लोकांना वितरित करण्यात येणार आहे. या योजनेची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत असेल. यासाठी लोकांना सरकारी कार्यालयात खेपा घालाव्या लागणार नाहीत किंवा रांगेत उभे रहावे लागणार नाही. प्रत्येक कुटुंबाला ‘गृहलक्ष्मी’ योजनेचे एक ‘कार्ड’ वितरित केले जाईल. या ‘कार्ड’वर एक ‘युनिक’ क्रमांक असेल आणि ‘हेल्पलाईन’वर संपर्क करून हा क्रमांक सांगायचा आहे. ही योजना बंगालमध्ये यशस्वीपणे लागू करण्यात आली आहे.’’ या वेळी पत्रकारांनी ‘गोव्यात तृणमूल काँग्रेसचे सरकार आल्यास भाजप सरकारच्या योजना बंद केल्या जाणार का ?’, असा प्रश्‍न केला असता खासदार मोईत्रा यांनी योजना बंद केल्या जाणार नाहीत, तर त्यामध्ये आवश्यक सुधारणा केल्या जाणार, असे सांगितले.