सांगोड, मोले येथे झाडे कापल्याचे प्रकरण
पणजी, ७ डिसेंबर (वार्ता.) – सांगोड, मोले येथे झाडे कापल्याच्या प्रकरणी गोवा शासन आणि ‘तम्नार’ प्रकल्पाचे अधिकारी यांच्या विरोधातील अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ७ डिसेंबर या दिवशी सुनावणीला प्रारंभ झाला. ‘गोवा फाऊंडेशन’ या पर्यावरणप्रेमी संघटनेने ही अवमान याचिका प्रविष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने १ हेक्टर क्षेत्रात १० टक्क्यांहून अधिक प्रमाणात झाडे असलेल्या भूमीचे रूपांतर न करण्याच्या आदेशाचे उल्लंघन करून न्यायालयाचा अवमान केल्याची याचिकदाराची तक्रार आहे.
‘गोवा फाऊंडेशन’चे क्लाऊड आल्वारीस म्हणाले, ‘‘सांगोड, मोले येथे तम्नार या वीजवाहिनी प्रकल्पासाठी ३ सहस्र झाडे कापल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून खेद व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील गोवा शासनाचे अधिवक्ता तुषार मेहता अन्य एका न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित असल्याने तम्नार प्रकल्पाच्या सुनावणीला अनुपस्थित राहिले. यावरही सर्वोच्च न्यायालयाने नापसंती व्यक्त केली.’’