नाशिक, ५ डिसेंबर (वार्ता.) – आपण मुंबईत राहूनही मराठीत बोलत नाही. टॅक्सीवाल्यांनाही मराठी येत नाही; कारण आपण त्यांच्याशी मराठीत बोलत नाही. दुकानांची नावे देवनागरी लिपीत लिहिण्याचा कायदा आहे; पण दुकानात चढतांना आपणच मराठीला पायरीवर ठेवून दुकानात हिंदीमध्ये बोलतो. आपण मराठीत बोललो तर अन्य भाषिकांनाही कधीतरी मराठीत बोलावे असे वाटेल. मराठी भाषा आपण स्वत: बोललो तरच मराठी वाचेल, असे वक्तव्य निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या वेळी निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर म्हणाले, ‘‘मराठीला ज्ञानभाषा करायची आहे, असे आपण म्हणतो; परंतु दुसरीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी मुले इंग्रजी शाळांकडे आकर्षित होत आहेत; कारण सरकार आणि पालक दोघेही मराठी शाळांना पाठिंबा देत नाहीत. मराठी शाळा बंद पडायचे थांबवायचे असेल, तर मराठी शाळांना आवश्यक ती साधनसामुग्री सरकारने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.’’