हिंदूंनो, मनोवृत्ती पालटा !

हिंदूंचे सण आले की, अन्न आणि औषध प्रशासनाकडून बनावट खवा जप्त, भेसळयुक्त दूध, तेल जप्त यांसह अनेक भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त केल्याची वृत्ते नेहमीच येतात. ‘दीपावली’ हा सण देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने या कालावधीत कारवाई झाल्याची वृत्तेही अधिक प्रमाणात असतात.

 

१ नोव्हेंबर या दिवशी अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने परराज्यातून खवा वाहतूक करणार्‍या वाहनांच्या पडताळणी मोहिमेच्या अंतर्गत मिरज येथे वाहनांवर धाड टाकून २ लाख ७० सहस्र १४८ रुपयांचा खवा जप्त करण्यात आला. हा खवा विनाअनुमती, विनानोंद आणि अस्वच्छ वाहनामधून वाहतूक करत असल्याचे आढळल्याने, तसेच भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला. या प्रकरणातील दोन्ही मालक हिंदूच आहेत, तसेच २ नोव्हेंबर या दिवशी मिठाई आणि खवा सिद्ध करण्यासाठी वापरले जाणारे बनावट अन् आरोग्यास हानीकारक असलेले पदार्थ असा बनावट खव्याचा साठा नगर शहरात जप्त करण्यात आला आहे. दीड टन वजनाचा हा साठा गुजरात येथून आला होता. ही केवळ प्रातिनिधिक उदाहरणे असून कारवाई झालेली आणि उघड न झालेली किती प्रकरणे असतील ? याचा अंदाजच मांडू शकत नाही.

दुर्दैवाने हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने आणि पैसा हेच सर्वस्व वाटत असल्याने ते प्रत्येक गोष्टीकडे पैसा कमावण्याचे साधन म्हणूनच पहातात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दीपावली, गुढीपाडवा अशा सणांना हिंदू मोठ्या प्रमाणात दूध आणि दुधाचे पदार्थ खरेदी करतात. त्यामुळे या सणांच्या वेळी अधिकाधिक भेसळ करून त्यातून पैसा कमवण्याचा विचार अनेक हिंदू विक्रेते-व्यापारी करतात. अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी भेसळ असलेला माल सापडला अशी उदाहरणे क्वचितच ऐकावयास मिळतात. हिंदूंनी सण उत्सवांच्या वेळी आपल्याच धर्मबांधवांना भेसळयुक्त पदार्थ देणे म्हणजे ‘एका भावाने दुसर्‍या भावाला विष देण्यासारखेच’ आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अशा प्रकारे फसवणूक केल्यामुळे पाप लागते हा भाग हिंदूंना ठाऊक नाही किंवा त्याचे गांभीर्य लक्षात येत नाही.

हिंदूंनो, ‘प्रत्येक कृती देव पहातो’, या भावाने केल्यास फसवणूक करण्याचे विचार येणार नाहीत. दीपावलीच्या निमित्ताने अन्नपदार्थांमध्ये भेसळ न करण्याचा संकल्प करूया.

– श्री. अजय केळकर, सांगली