अधिकाधिक हिंदूंनी मोर्च्यात सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावण्याचे आवाहन !
गोवंशीयांच्या हत्या न थांबवण्यामागचे प्रशासनाचे हितसंबंध उघड झाले पाहिजेत ! – संपादक
वसई-विरार, १० नोव्हेंबर (वार्ता.) – गत काही वर्षांपासून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोवंशियांच्या हत्या आणि मांसाची विक्री होत आहे. यांविरोधात मागील ५ वर्षांत ६० हून अधिक तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत. स्थानिक नागरिक, गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी पोलिसांच्या साहाय्याने अनेकदा गोवंशियांचे मांस पकडून दिले अन् त्यांचे प्राण वाचवले; मात्र आजही परिसरात मोठ्या प्रमाणावर गोवंशशियांच्या हत्या होत आहेत अन् मांसविक्री होत आहे. या प्रकरणात आतापर्यंत पकडलेल्या दोषींवर ठोस कारवाई केली जात नाही, अशी येथील स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. यावरून वसई-विरार महानगरपालिकेचे यावर नियंत्रण नाही, हेच दिसून येते. या प्रकरणाच्या विरोधात १२ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. विरार येथील फुलपाडा परिसरातील हॉटेल आर्.जे. नाका येथून मोर्च्याला प्रारंभ होऊन वसई-विरार महानगरपालिकेच्या जवळ त्याची सांगता होईल.
अखिल भारतीय गोवंश रक्षण आणि संवर्धन परिषदेचे श्री. राजेश पाल म्हणाले, ‘‘मी २६ ऑक्टोबर २०२० आणि २४ मार्च २०२१ या दिवशी पत्राद्वारे गोवंशियांची हत्या अन् मांसविक्रीचा प्रकार वसई-विरार महापालिकेच्या लक्षात आणून दिला होता. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून यांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. तसा आदेशही प्रशासनाला दिलेला आहे; मात्र प्रत्यक्षात तशी कारवाई झालेली नाही. मांसविक्रीचा परवाना देतांना आवश्यक गोष्टींची पूर्तता न करता परवाने दिले जात आहेत. काही ठिकाणी व्यावसायिक घरपट्टी नसतांना पालिका अधिकार्यांनी निवासी घरपट्टीवर परवाने दिले आहेत. अशा अधिकार्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.’’
मोर्च्यात सहभागी होणार असलेल्या संघटना !या मोर्च्यात स्थानिक हिंदूंसह मानद पशू कल्याण अधिकार्यांसह अखिल भारतीय गोवंश रक्षण व संवर्धन परिषद, बजरंग दल, हिंदु गोवंश रक्षा समिती, हिंदु युवा वाहिनी, गायत्री परिवार ट्रस्ट, पतंजलि योग समिती, विराट हिंदुस्थान संगम आणि हिंदु जनजागृती समिती या हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी होणार आहेत, असे श्री. पाल यांनी सांगितले. ‘हिंदूंनी मोर्च्यात सहभागी होऊन त्यांचे धर्मकर्तव्य बजावावे’, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. |