केंद्र आणि गोवा सरकार यांच्या निर्णयामुळे गोमंतकियांना दिलासा
पणजी, ४ नोव्हेंबर (वार्ता.)- केंद्र सरकारने दीपावलीच्या पूर्वसंध्येला ३ नोव्हेंबर या दिवशी पेट्रोलवरील मूल्यवर्धीत कर (व्हॅट) ५ टक्के, तर डिझेलवरील मूल्यवर्धीत कर (व्हॅट) १० टक्क्यांनी घटवल्याची घोषणा केली होती. यामुळे पेट्रोल आणि डिझेल यांचे दर प्रतिलिटर अनुक्रमे ५ आणि १० रुपयांनी घटले. केंद्राच्या या घोषणेनंतर राज्यशासनाने पेट्रोलवरील मूल्यवर्धीत कर (व्हॅट) २० टक्के, तर डिझेलवरील मूल्यवर्धीत कर (व्हॅट) १७ टक्क्यांनी घटवणार असल्याची घोषणा केली. राज्यशासनाच्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेल यांचे दर प्रतिलिटर ७ रुपये घटणार आहे. केंद्र आणि राज्य शासन यांच्या या निर्णयांमुळे एकंदरीत राज्यात पेट्रोलचा दर १२ रुपयांनी, तर डिझेल १७ रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्र आणि गोवा सरकार यांच्या या निर्णयामुळे गोमंतकियांना दिलासा मिळाला आहे.
राज्यशासनावर प्रतिवर्ष ३०० कोटी रुपयांचा पडणार आर्थिक बोजा
पेट्रोल आणि डिझेल वरील मूल्यवर्धीत कर घटवल्याने राज्यशासनानावर प्रतिमास २४ कोटी रुपये, तर प्रतिवर्ष ३०० कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.