राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट दर्जावरून विरोधकांनी सरकारला केले लक्ष्य !

गोवा विधानसभा अधिवेशन

कंत्राटदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवल्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

पणजी, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – पत्रादेवी ते काणकोणपर्यंत चालू असलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट प्रतीचे होत असल्याविषयी १८ ऑक्टोबर या दिवशी अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी प्रश्नोत्तर तासाच्या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभु पाऊसकर यांना धारेवर धरले. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून पत्रादेवी ते म्हापसापर्यंतचे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे आश्वासन दिले, तसेच या कामात दिरंगाई केल्याच्या प्रकरणी कंत्राटदार एम्.व्ही. राव यांना सरकारकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे आणि त्यांच्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढे सांगितले.

प्रश्नोत्तर तासाच्या वेळी विरोधक म्हणाले, ‘‘कामाच्या ठिकाणी काही पालट सुचवायचा असल्यास ते ऐकून घेण्यासाठी संबंधित अभियंते त्या ठिकाणी नसतात. महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याविषयी सरकारने संबंधित कंत्राटदाराला जाब विचारला आहे का ? कंत्राटदारावर कारवाई केली आहे का ?’’ रस्ता वाहतूक महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात वर्ष २०१९ मध्ये सुमारे ३ सहस्र ४४० अपघात झाले आणि यातील १ सहस्र १६० अपघात हे राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांची स्थिती वाईट असल्याने झाले. या अपघातात ६६ जणांचा बळी गेला. ‘वाय’ जंक्शनवर ३९, तर राष्ट्रीय महामार्गावर १४४ अपघात झाले. या निकृष्ट दर्जाच्या कामाचा त्रास वाहनचालकांना होत आहे. हे काम करतांना भूमीगत जलवाहिनी आणि वीजवाहिनींच्या केबल्स तोडल्या जात आहेत.’’

पत्रादेवी-काणकोण रस्त्याचे काम डिसेंबरच्या अखेरपर्यंत पूर्ण करणार ! – दीपक प्रभु पाऊसकर, सार्वजनिक बांधकाममंत्री

राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांच्या कामाविषयी काही प्रश्न आहेत. संबंधित कंत्राटदाराला यापूर्वी २ वेळा ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. सध्या पत्रादेवी ते काणकोण राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने चालू आहे आणि ते डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध जलवाहिन्या, तर वीजवाहिनी रस्त्याच्या बाजूला स्थलांतर करण्यात आल्याने यापुढे केबल तुटण्याच्या समस्या उद्भवणार नाहीत, असे सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभु पाऊसकर यांनी सांगितले.

१ नोव्हेंबरपर्यंत डागडुजी ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पणजी ते मडगाव या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलाखालील रस्ते पूर्णपणे खराब झालेले आहेत. या रस्त्यांची डागडुजी १ नोव्हेंबरपूर्वी करण्याचे निर्देश कंत्राटदाराला दिले जाणार आहेत. पर्वरी येथून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधीचा प्रश्न सामंजस्याने सोडवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.