श्री दुर्गादेवीची बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी तुलना करणार्‍या विधानाचा मी निषेध करतो ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

‘गोवा फॉरवर्ड’चे उपाध्यक्ष किरण कांदोळकर यांनी श्री दुर्गादेवीचा अवमान केल्याचे प्रकरण

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – श्री दुर्गादेवीची बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी तुलना करणार्‍या ‘गोवा फॉरवर्ड’चे उपाध्यक्ष किरण कांदोळकर यांच्या विधानाचा मी निषेध करतो, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. ‘बंगालच्या देवी दुर्गेला (बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना) गोव्यातील भस्मासुरासारख्या सरकारला घरी पाठवण्यासाठी आणणे आवश्यक आहे’, असे विधान ‘गोवा फॉरवर्ड’चे उपाध्यक्ष किरण कांदोळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले होते.  या विधानावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे मत व्यक्त केले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने गोव्यात प्रवेश केला आहे. या निवडणुकीत भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी ‘गोवा फॉरवर्ड’, तृणमूल काँग्रेस आदी विरोधी पक्ष प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर ‘गोवा फॉरवर्ड’चे उपाध्यक्ष किरण कांदोळकर यांनी हे विधान केले होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘देवीची मनुष्याशी केलेली तुलना गोमंतकीय सहन करणार नाहीत. श्री शांतादुर्गादेवीची तुलना मनुष्याशी करता येणार नाही. या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध झाला पाहिजे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी यांनी बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तेथील महिला आणि लोक यांच्यावर अत्याचार केले. अशा व्यक्तीची तुलना देवीशी कशी करता येईल ?’’

समविचारी पक्षाशी युती करण्यास भाजप सिद्ध

समविचारी पक्षाशी युती करण्यास भाजप सिद्ध आहे. निवडणूकपूर्व युतीसंबंधी चर्चेला प्रारंभ करता येतो; मात्र युतीविषयी अंतिम निर्णय देहली येथील पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. गोव्यात आज समाजविघातक नवीन पक्ष निवडणुकीच्या माध्यमातून गोव्यात प्रवेश करू इच्छित आहेत.