शाळेची घंटा वाजली; पण…!

प्रतिकात्मक छायाचित्र

कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आलेल्या शाळा (मधला काही कालावधी सोडला तर) १८ मासांनी पुन्हा ४ ऑक्टोबरपासून पूर्ववत् चालू झाल्या. बहुसंख्य ठिकाणी ‘शाळा चालू होणार’ याचा आनंद विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि शाळेशी संबंधित व्यावसायिक यांच्या तोंडवळ्यावर ओसंडून वहात होता. काही शाळांमध्ये गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन, तर काही ठिकाणी वाजतगाजत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेबाहेरील पटांगणात भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या; कारण गेल्या १८ मासांत विद्याध्ययनाचे केंद्र असलेल्या शाळेपासून दूर रहाणे सर्वांना असह्य झाले होते, हे वरील कृतींतून लक्षात येते. शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एकमेकांच्या समोर बसून शिकणे अन् शिकवणे यातील आनंद एक वेगळाच आहे, हे कोरोनाच्या निमित्ताने दूर राहिल्यामुळे जाणवले. ऑनलाईन शिक्षणामधून ज्ञान मिळाले; परंतु एकमेकांच्या सान्निध्यात राहून ज्ञान घेण्यातील जिवंतपणा एक वेगळाच आहे, हेही अनुभवायला मिळाले.

आता परिस्थिती पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे शाळा चालू झाल्या; पण शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थी यांना अनेक नवीन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शाळा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र त्यामध्ये काही नियम लागू करण्यात आले आहेत, ज्यामध्ये वर्ग मर्यादेच्या अर्ध्या क्षमतेने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. त्यामुळे एका वर्गातील विद्यार्थी एक दिवस अर्धे, तर दुसर्‍या दिवशी अर्धे, असे बोलवावे लागत आहेत. जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत, त्यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ शिक्षणही चालू ठेवावे लागत आहे. यामुळे शिक्षकांना एकच अभ्यासक्रम ३ वेळा शिकवावा लागत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी ‘सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन, योग्य पद्धतीने मुखपट्टीचा वापर, नियमितपणे हातांची स्वच्छता आणि तापासह अन्य काही शारीरिक लक्षणे असल्यास शाळेत न येणे, एकमेकांच्या वस्तूंचा वापर टाळणे’, या सर्वसाधारण सूचनांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. शाळा व्यवस्थापनाने ‘शाळेशी संबंधित सर्व कर्मचारी, शिक्षक यांचे लसीकरण, शाळेमध्ये योग्य प्रमाणात हवा खेळती ठेवणे, गर्दी टाळणे, संसर्ग टाळण्यासाठी मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, आदी गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शाळा चालू झाल्या; पण त्या पुन्हा कोणत्याही आपत्कालीन कारणांमुळे बंद पडू नयेत, यासाठी देवाच्या चरणीच प्रार्थना करणे आणि शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक अन् विद्यार्थी यांनी दायित्वाने सर्व काळजी घेणे आवश्यक आहे.

– श्री. नीलेश पाटील, जळगाव