‘पू. अनंत आठवले यांची वैशिष्ट्ये’ या ग्रंथाचे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात चैतन्यमय वातावरणात प्रकाशन !

सनातन आश्रम (रामनाथी), ९ ऑक्टोबर (वार्ता.) – श्रीमद्भगवद्गीतेचे गाढे अभ्यासक, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू आणि सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांची गुणवैशिष्ट्ये उलगडणार्‍या ‘पू. अनंत आठवले यांची वैशिष्ट्ये : खंड १’ या नूतन मराठी ग्रंथाचे ५ ऑक्टोबर या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात चैतन्यमय वातावरणात प्रकाशन करण्यात आले. साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेमध्ये मार्गदर्शन करणार्‍या या ग्रंथाचे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, पू. अनंत आठवले, त्यांच्या पत्नी सौै. सुनीती अनंत आठवले, सनातनच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर यांनी केले

ग्रंथाचे मुखपृष्ठ

सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या खरेदीसाठी स्थानिक संपर्क :९३२२३ १५३१७

‘पू. अनंत आठवले यांची वैशिष्ट्ये : खंड १’ या ग्रंथाचे प्रकाशन करतांना डावीकडून सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, सौ. सुनीती अनंत आठवले, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, पू. अनंत आठवले आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

पू. भाऊंचे चरित्र हा व्यष्टी आणि समष्टी गुणांचा सुवर्ण संगम ! – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले

साधनेमध्ये ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग या तिन्ही योगांचा सुंदर समन्वय अतिशय दुर्लभ आहे. पू. अनंत आठवले यांचे व्यक्तीमत्त्व या अद्वितीय दृष्टीनेही शोभणारे आहे. बहुतेक व्यष्टी प्रकृतीचे साधक आणि भक्त समष्टीशी समरस होतांना दिसत नाहीत. पू. भाऊ हे लहानपणापासून व्यष्टी प्रकृतीचे असतांनाही ते सनातनच्या साधकांच्या संपर्कात आल्यापासून साधकांना त्यांचे समष्टी गुण लक्षात यायला लागले. पू. भाऊ यांच्यातील सहजपणे बोलणे, प्रेमभाव, इतरांचा विचार करणे अशा विविध गुणांविषयी साधकांनी लिहून दिले आहे. पू. भाऊंनी अध्यात्मावर लिहिलेले ग्रंथ आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये प्रकाशित होणारे त्यांचे विविध लेख यांमधून त्यांची समष्टीला ज्ञान देण्याची तळमळ दिसून येते. पू. भाऊंचे चरित्र हा व्यष्टी आणि समष्टी गुणांचा सुवर्ण संगम आहे. सनातनने प्रकाशित केलेला हा ग्रंथ अभ्यासल्याने व्यष्टी प्रकृतीच्या साधकांनाही इतरांचा विचार करणे, प्रेमभाव, सेवा परिपूर्ण करणे अशा प्रकारचे समष्टी गुण आत्मसात करण्यासाठी योग्य दिशा मिळेल आणि ते जलद गतीने आध्यात्मिक उन्नती करू शकतील.

चित्त शुद्ध झाले, तर आपल्याला ईश्वराचे दर्शन होईल ! – पू. अनंत आठवले

ग्रंथ प्रकाशनाच्या वेळी पू. अनंत आठवले यांनी व्यक्त केलेले मनोगत !

ब्रह्मत्व प्राप्त करण्यासाठी स्वतःला शुद्ध करणे आवश्यक !

उपनिषदांमध्ये सांगितले आहे, ‘यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ।’, म्हणजे ब्रह्माला प्राप्त करण्यासाठी वाणी आणि मन यांनी अयशस्वी प्रयत्न केला अन् परत आले. याचा अर्थ आहे की, वाणी आणि मन यांच्याद्वारे ब्रह्मत्व प्राप्त होत नाही. त्याला प्राप्त करण्यासाठी स्वत:ला शुद्ध केले पाहिजे. आपले स्वभावदोष संपूर्णतः घालवले पाहिजेत. एकदा चित्तशुद्धी झाली की, तुम्हाला कोणतेही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. ईश्वर स्वत:च तुम्हाला त्याचे दर्शन देईल. ईश्वर आपल्यामध्येच आत्मस्वरूपात आहे; पण आपल्यातील स्वभावदोषांमुळे तो झाकोळला गेला आहे. ईश्वर स्वयंप्रकाशी आहे. एकदा स्वभावदोष दूर केले की, आपल्याला त्याचा बोध होईल.

ईश्वर किंवा ब्रह्म जाणून घेण्यासाठी मनन-चिंतन करावे लागते !

साधना करण्यासाठी किंवा ब्रह्मप्राप्तीसाठी मी कधीच काही केले नाही. प्रारंभी मला ‘ईश्वर आहे का ?’ याविषयी जिज्ञासा होती. त्यानंतर ‘ईश्वर काय आहे’, ‘ब्रह्म काय आहे’, हे जाणून घेण्याची इच्छा झाली. त्यामुळे मी अभ्यास करणे चालू केले. अनेक ग्रंथ वाचावे लागले. शब्दांचा अर्थ समजतो किंवा तो शब्दकोषांमध्येही मिळून जातो; परंतु त्याचे सार कळत नाही. त्यासाठी चिंतन-मनन करावे लागते. माझे सर्व आयुष्य त्यातच गेले.

बुद्धीने निश्चय केल्यावर व्यक्तीकडून आपोआप तसेच आचरण होते !

‘उपनिषदे’, ‘श्रीमद्भगवद्गीता’, ‘योगवासिष्ठ’, तसेच अनेक ग्रंथांमधील ज्ञान वाचता वाचता जेव्हा मनाला त्यातील मर्म समजते, तेव्हा बुद्धी निश्चय करते की, हेच बरोबर आहे. तेव्हा त्याचा जिवात्म्यामध्ये बोध होतो. जेव्हा एखादी गोष्ट निश्चितपणे तुमच्या लक्षात येते, तेव्हा तुमचे आचरण त्याप्रमाणे होणारच ना ? त्यानंतर अन्य साधनांची आवश्यकताही वाटत नाही. ‘चोरी करणे चुकीचे आहे’, हे ठाऊक असतांनाही चोर चोरी का करतात ? तुम्ही आणि मी चोरी केली नाही; कारण ‘ते चुकीचे आहे’, हे बुद्धीला निश्चितपणे ठाऊक आहे. अशा पद्धतीने मला अन्य दोषांविषयी लक्षात येते. ‘जे निश्चितपणे चुकीचे आहे’, त्या संदर्भात बुद्धी निश्चय करते. हे मनावर अंकित झाल्यामुळे जीवात्म्याला बोध होतो आणि व्यक्तीकडून आपोआप तसेच आचरण होते. हळूहळू त्याची सहजावस्था बनते. मी केवळ जिज्ञासेने अभ्यास केला आहे, दुसरे काहीच केले नाही.

ज्ञान चैतन्याचा अंश आणि स्वरूप आहे !

मी कोणतीच साधना केली नाही. कोणतेही जप-तप केले नाही. भगवंताच्या कृपेने आपोआप ज्ञान होते. मी एका ग्रंथामध्ये लिहिले आहे, मुंडकोपनिषदमध्ये आहे, ‘ज्ञानप्रसादेन विशुद्धसत्त्वः ततस्तु तं पश्यते निष्कलं ध्यायमानः ।’, म्हणजे ज्ञानाच्या कृपेने चित्त शुद्ध होऊन ते एकाग्रचित्त होऊन आत्मस्वरूपाचा आत्मसाक्षात्कार होतो. ही ज्ञानाची कृपा आहे. ज्ञान म्हणजे चैतन्य. ज्ञान चैतन्याचा अंश आणि चैतन्याचे स्वरूप आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)