‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी ‘निर्विचार’ हा नामजप आवाजात ध्वनीमुद्रित केला आहे. तो नामजप ऐकल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. ‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना आलेल्या अनुभूती

अ. ‘नामजप ऐकतांना माझा भाव जागृत झाला.

आ. अनाहतचक्राच्या ठिकाणी मला नामजपाची स्पंदने जाणवली आणि मनाला आनंद जाणवला.

२. ‘निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप ऐकल्यावर आलेल्या अनुभूती

‘निर्विचार’ नामजप ५ वेळा ऐकल्यानंतर, भावजागृती होते; तर ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप ऐकायला प्रारंभ केल्यावर लगेच भावजागृती होते. यातून लक्षात आले की, साधनेच्या प्रारंभीच्या टप्प्यात भावजागृती होण्यासाठी ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप साहाय्यक ठरतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१२.६.२०२१)

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करण्याचे महत्त्व !

‘मन जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले, तरी मन कार्यरत असते, तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला, तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतात. याउलट ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो. त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास साहाय्य होते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

नामजप ऐकतांना मन एकाग्र होऊन ते निर्विचार स्थितीत जाऊ लागणे

‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना माझे मन लगेच एकाग्र होऊन ते निर्विचार स्थितीत जाऊ लागले. त्यानंतर माझा भाव थोडा जागृत झाला आणि मला आनंद जाणवू लागला. त्या वेळी ‘माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी वलये निर्माण होऊन ती बाहेर प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले. थोड्या वेळाने अनाहतचक्राच्या ठिकाणी मला शीतल संवेदना जाणवल्या.’ (१७.६.२०२१)

श्रीचित्‌शक्ति्  (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ

नामजप ऐकल्यावर भावजागृती होऊन अनाहतचक्राच्या ठिकाणी भावाची स्पंदने जाणवणे

‘निर्विचार’ हा नामजप ऐकून माझी भावजागृती झाली. मला माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी भावाची स्पंदने जाणवली आणि माझे मन भरून आले. त्यानंतर हळूहळू शरिरातील सर्व गात्रे शिथिल होऊन मला शांत वाटू लागले.’ (१७.६.२०२१)

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. स्व अस्तित्व अल्प होऊ लागणे

‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना नामजपाचा पहिला शब्द कानी पडताच मला ‘स्वतःचे अस्तित्व अल्प होऊ लागले आहे’, असे जाणवले. ‘आपले अस्तित्व अल्प होऊ लागणे’, म्हणजे मनोलय आणि बुद्धीलय होऊ लागणे ! माझा श्वासही थांबल्यासारखा झाला.

२. अनाहतचक्राच्या ठिकाणी जाणवलेला परिणाम

नामजप ऐकतांना ‘तो अनाहतचक्राच्या ठिकाणी चालू आहे’, असे मला जाणवले. समुद्रकिनार्‍यावर भरतीची लाट येऊन ती ओसरल्यावर जसे मोकळे वाटते, तसे प्रत्येक नामजप ऐकतांना मला जाणवत होते.

३. या नामजपामुळे ‘माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली’, असे माझ्या लक्षात आले.

४. नामजपाचा आवाज अल्प आणि अधिक केल्यावर जाणवलेला परिणाम

नामजप हळू आवाजात ऐकल्यावर मला तात्काळ ध्यानावस्था प्राप्त झाली. याउलट तो मोठ्या आवाजात ऐकल्यावर ध्यानावस्था प्राप्त व्हायला वेळ लागला. याचा अर्थ ‘निर्विचार’ हा नामजप हळू आवाजात ऐकणे अधिक परिणामकारक आहे.’ (१७.६.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक