सिंधुदुर्गवासियांनी स्वच्छता सर्वेक्षणात सक्रीय सहभाग घ्यावा ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आवाहन

के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – ‘स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)’ अंतर्गत वर्ष २०२१ करता ग्रामीण भागात स्वच्छता सर्वेक्षण चालू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामध्ये लोकसहभाग महत्त्वाचा असून जिल्ह्यातील नागरिकांनी स्वच्छता सर्वेक्षणात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

स्वच्छता सर्वेक्षणात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचा सहभाग असून ग्रामपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे, जसे आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी, बाजाराची ठिकाणे, धार्मिक स्थळे यांची स्वच्छतेच्या अनुषंगाने पडताळणी होणार आहे. या अभियानासाठी ३०० गुण असून सर्वेक्षणाच्या अंती जिल्ह्याला गुण देण्यात येणार आहेत. ‘स्वच्छ भारत अभियानात (ग्रामीण)’ नागरिकांचा सहभाग नोंदवण्यासाठी ‘गूगल प्ले स्टोअर’वर ‘एस्.एस्.जी. २१’, हे ॲप चालू करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून गावातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता सुविधा यांच्या विषयीच्या प्रश्नांची उत्तरे ग्रामस्थांनी द्यायची आहेत. ग्रामस्थांच्या मतांसाठी ३५० गुण असून भ्रमणभाषवरून ॲपद्वारे जिल्हावासियांनी नोंदवलेल्या मतांच्या माध्यमातून जिल्ह्याला गुण मिळणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेच्या क्षेत्रात कायम अव्वल राहिला आहे. जिल्हावासियांनी त्यांचे मत नोंदवून जिल्ह्याला ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियाना’त पुन्हा एकदा अव्वल स्थानी ठेवावे, असे आवाहन के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.