शिक्षकांचा आदर्श (?)

प्रतीकात्मक छायाचित्र

कोरोनाच्या संसर्गामुळे दळणवळण बंदी लागू असल्याने राज्यातील शाळा आणि महाविद्यालये ‘ऑनलाईन’ माध्यमातून चालू आहेत. गणेशोत्सवाच्या सुट्टीनंतर ‘ऑनलाईन’ वर्ग चालू झाले. एका शाळेतील ‘इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांचा सकाळी ७.३० वाजता एका विषयाचा ऑनलाईन वर्ग चालू होणार’, असे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हॉट्सॲपच्या गटावर कळवण्यात आले होते. त्यानुसार ठरलेल्या दिवशी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन जोडणी केली. वेळ उलटून गेली, तरीही शिक्षक आलेलेच नव्हते. साधारणतः ६० विद्यार्थी त्या वर्गासाठी उपस्थित होते. त्यामुळे विद्यार्थी आपापसांतच व्हॉट्सॲपवर शिक्षकांच्या उपस्थितीविषयी विचारू लागले. एका विद्यार्थिनीने ‘आज वर्ग आहे का ?’, असे गटात विचारल्यावर संबंधित शिक्षकांनी ‘वर्ग होणार नाही’, असे कळवले. त्यामुळे त्या दिवशी शाळेला सुट्टीच मिळाली !

वर्ग होणारच नव्हता, तर शिक्षकांनी तसे विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲपच्या गटावर अगोदरच ‘पोस्ट’ का केले नाही ? इतक्या विद्यार्थ्यांना वर्गासाठी विनाकारण वाट पहावी लागली. हा शाळा प्रशासन आणि शिक्षक यांचा हलगर्जीपणा नव्हे का ? विद्यार्थ्यांना शिकवणे आणि घडवणे, हे सर्वस्वी शिक्षकांचे दायित्व अन् कर्तव्यही असते; पण शिक्षकांना त्याचा सोयीस्कररित्या विसर पडलेला आहे, असे अनेक उदाहरणांतून दिसून येते. वरील प्रसंगात तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नेमून दिलेल्या वेळेच्या आधी ५ मिनिटे उपस्थित रहाणे अपेक्षित होते; पण तसे न होता शिक्षकच अनुपस्थित राहिले. अशा शिक्षकांना विद्यार्थ्यांचा उपस्थिती पट (अटेंडन्स) घेण्याचा अधिकार तरी आहे का ? शिक्षकांच्या अशा छोट्या छोट्या अयोग्य कृतींमुळे विद्यार्थ्यांवरही अयोग्य संस्कार होतात. जर शिक्षक वेळेपूर्वी उपस्थित राहिले असते, तर विद्यार्थ्यांवर आपसूकच वक्तशीरपणाचा संस्कार निर्माण झाला असता. हे शिक्षकांनी लक्षात घेऊन स्वतःचे वर्तन त्यानुसार करायला हवे.

खरेतर शाळा हे विद्यार्थ्यांसाठी गुरुकुलच असते. अशा गुरुकुलातून शिकून पुढे जाणारा विद्यार्थी आदर्शच घडला पाहिजे; पण हे शिक्षकांवर अवलंबून आहे. नीतीमूल्यांचे केवळ वर्ग घेऊन नव्हे, तर ती अंगीकारल्यासच योग्य मार्गावर वाटचाल करता येते. आदर्श विद्यार्थी घडण्यासाठी शिक्षकही आदर्श असायला हवेत, हेच खरे !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.