माहूरगड येथील रेणुकादेवी मंदिर, दत्त शिखर मंदिर आणि अनसूया माता मंदिर यांसाठी ‘रोप वे’ उभारण्यासाठी ५१ कोटी रुपयांची संमती

माहूर (जिल्हा नांदेड) येथील रेणुकामाता मंदिर आणि श्री दत्त शिखर मंदिर दर्शनासाठी आता ‘रोप वे’ने जाता येणार ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

नांदेड – विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पर्यटनाची जोड देऊन भक्तांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासमवेतच त्या-त्या भागांत रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूरगडही त्यादृष्टीने विकसित करून या परिसरातील वनसंपदा आणि पर्यटन यांच्या विकासकामांना प्राधान्य देत एकात्मिक विकास साधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

१. माहूरगडाच्या पायथ्याशी असलेल्या मातृ तीर्थाजवळील ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’पासून तीनही गडांवर जाण्या-येण्यासाठी ‘रोप वे’चे काम आता जलद गतीने पूर्णत्वास येईल, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. ‘रोप वे’ उभारण्यासंदर्भात राज्यशासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या ‘वॅपकॉस लिमिटेड’मध्ये नुकताच करार झाला आहे. या निमित्ताने त्यांनी माहिती दिली.

२. माहूर विकासाच्या दृष्टीने आजवर नोंदवल्या गेलेल्या पर्यटकांची संख्या, वाहनांची वर्दळ, भक्त आणि पर्यटक यांना अत्यावश्यक असलेल्या सेवा सुविधा, पर्यावरणाच्या दृष्टीने लागणार्‍या वन विभागाच्या मान्यता, येथील भूगर्भ रचनेनुसार कामाच्या गुणवत्तेविषयी आवश्यक असलेली काळजी आणि तसा आराखडा सिद्ध करणे ही सर्व कामे प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा म्हणून ‘वॅपकॉस लिमिटेड’ हे आस्थापन करेल. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मार्गदर्शन आणि अधिपत्याखाली ही विकासकामे होणार आहेत.