पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपच्या वतीने गोव्यात ‘सेवा-समर्पण’ अभियानाला प्रारंभ
पणजी, १७ सप्टेंबर (वार्ता.) – गुजरात, कर्नाटक यांच्यासह भाजपशासित ४ राज्यांतील मुख्यमंत्री पालटले आहेत, तरी ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यासाठी नवीन मुख्यमंत्री नेमण्याचा भाजपचा विचार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदेश भाजपच्या वतीने १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर ‘सेवा और समर्पण’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या निमित्ताने १७ सप्टेंबर या दिवशी भाजपच्या म्हापसा येथील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनकार्याची माहिती देणार्या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे पत्रकारांशी बोलत होते.
सदानंद शेट तानावडे पुढे म्हणाले, ‘‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यांच्या गोवा दौर्याच्या वेळी ‘डॉ. प्रमोद सावंत हेच भाजपचा मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा असतील’, असे घोषित केले आहे. केंद्रीय नेतृत्वाने या अगोदरच या विषयावर भाष्य केल्याने मला त्यासंदर्भात वेगळे बोलण्याचा अधिकार नाही. भाजपच्या नियमित प्रक्रियेनुसारच प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मंडल समिती उमेदवाराची निवड करते आणि केंद्रीय समिती त्यावर शिक्कामोर्तब करते.’’
शासनाच्या ‘सरकार तुमच्या दारी’ योजनेचा १९ सप्टेंबर या दिवशी थिवी येथे होणार शुभारंभ
पणजी – सरकार आता प्रत्येक नागरिकाच्या दारापर्यंत जाणार आहे. रविवार, १९ सप्टेंबर या दिवशी थिवी मतदारसंघात कोलवाळ येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ‘सरकार तुमच्या दारी’ या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘या योजनेच्या अंतर्गत शिधापत्रिका (रेशन कार्ड), आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, किसान कार्ड, निवासी किंवा उत्पन्न दाखला, पाणी किंवा वीजजोडणी, तसेच समाज कल्याणकारी योजना नागरिकांच्या दारात पोचवल्या जाणार आहेत. संबंधित खात्यातील अधिकारी योजनांची माहिती लोकांना देणार आहेत आणि अधिकाधिक लोकांना योजनांचा लाभ होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सर्व मतदारसंघांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. ’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोमंतकियांशी साधणार संवाद
पणजी – पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, १८ सप्टेंबर या दिवशी सकाळी १०.३० वाजता ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने गोमंतकियांशी संवाद साधणार आहेत. प्रमुख ठिकाणांच्या व्यवतिरिक्त सर्व ग्रामपंचायती आणि नगरपालिका; गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्य व्याख्यान सभागृह, राजीव कला मंदिर, फोंडा; नगरपालिका सभागृह, सांखळी; जुने आझिलो रुग्णालय सभागृह, म्हापसा; सर्व प्राथमिक, जिल्हा आणि सामाजिक आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी या संवाद कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या वेळी पात्र सर्व गोमंतकियांनी कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतल्यामुळे (१०० टक्के) पंतप्रधान नरेंद्र मोदी गोमंतकियांशी संवाद साधणार आहेत.