ख्रिस्ती धर्म स्वीकारलेली पत्नी, ३ मेहुण्या आणि त्यांचे पती यांनी धर्मांतरासाठी दबाव आणल्याची एका विवाहित हिंदु युवकाची तक्रार

बजरंग दलाकडून कारवाईची मागणी !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

फोंडा, १३ सप्टेंबर (वार्ता.) – सांताक्रूझ, पणजी येथील गौरिश्वर नारायण कोठारकर या विवाहित युवकावर धर्मांतर करण्यासाठी त्याची ख्रिस्ती पत्नी, ३ मेहुण्या आणि त्यांचे पती यांच्याकडून बळजोरी केली जात आहे. या संशयितांसह खर्‍या सूत्रधाराचा सखोल तपास करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून करण्यात आली आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हे विभागाकडे लेखी तक्रार नोंदवण्यात आली असल्याची माहिती बजरंग दलाच्या वतीने अधिवक्ता स्वप्नील कांबळी यांनी फोंडा येथील पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेसाठी विश्व हिंदु परिषदेचे गोव्याचे अध्यक्ष संतोष महानंदू नाईक, मोहन आमशेकर, बजरंग दलाचे ब्रिजेश शुक्ला, धर्म जागरण समितीचे अनिल शर्मा आणि तक्रारदार गौरिश्वर कोठारकर उपस्थित होते.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार गौरिश्वर कोठारकर मूळ कारवार येथे रहाणारे असून गोव्यात एका फार्मास्युटिकल आस्थापनात नोकरीला आहेत. त्यांची पत्नी, तिच्या ३ विवाहित बहिणी, बहिणींचे पती आणि भाऊ हे सर्व कुटुंबसदस्य ख्रिस्ती धर्मांत धर्मांतरित झाले आहेत. एक वर्षापूर्वी गौरिश्वर यांचा विवाह झाल्यापासून त्यांची पत्नी, ३ मेहुण्या आणि त्यांचे पती यांच्याकडून गौरिश्वर यांच्यावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जात आहे आणि बळजोरी केली जात आहे, असे अधिवक्ता कांबळी यांनी सांगितले.

अधिवक्ता कांबळी म्हणाले, ‘‘धर्मांतराला विरोध केल्यामुळे ‘गौरिश्वर कोठारकर हे पत्नीचा हुंड्यासाठी छळ करत आहेत’, अशी तक्रार कारवार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे, तसेच गौरिश्वर यांना धमक्या दिल्या जात आहेत. गोव्यासह कर्नाटकातही पैशांचे आमीष दाखवून किंवा बळजोरीने धर्मांतर करण्याचे प्रकार चालू आहेत. गोव्यात अशी टोळी कार्यरत असून त्यांच्याकडे या अवैध कार्यासाठी पैसा कुठून येतो, याची चौकशी करण्यात यावी. गौरिश्वर कोठारकर यांच्या तक्रारीची शासनाने गांभीर्याने नोंद घेऊन या प्रकरणी सखोल अन्वेषण करावे.’’

या वेळी गौरिश्वर कोठारकर म्हणाले, ‘‘माझे लग्न २०२० मध्ये झाले. माझे लग्न होईपर्यंत माझी पत्नी आणि तिचे कुटुंबीय यांनी मला ते ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित झाले असल्याची कुठलीच कल्पना दिली नव्हती. त्यांनी त्यांची मूळ नावेही पालटलेली नाहीत. लग्न झाल्यावर काही दिवसांनी पत्नी आणि मेहुण्या यांच्याकडून मला ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करण्यास प्रारंभ झाला. माझी आई आणि बहीण यांनीही धर्मांतर करावे, असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी पैसे आणि चारचाकी वाहन देण्याचे आमीष दाखवण्यात आले. मी याला विरोध केल्याने माझ्याविरोधात ‘हुंड्यासाठी पत्नीचा छळ करत आहे’, अशी तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच धमक्याही दिल्या जातात. यामागे धर्मांतर करणारे अन्य सूत्रधार असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्या कारवाई करण्यात यावी.’’

बजरंग दलाचे ब्रिजेश शुक्ला यांनी महाराष्ट्र राज्यात मुंबई, पुणे, तसेच कर्नाटक राज्यात धर्मांतर करण्यार्‍या टोळ्या सक्रीय असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘हिंदु धर्मियांवर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जातो. प्रारंभी पैशांचे आमीष दाखवले जाते. त्याला बळी न पडल्यास अन्य मार्ग अवलंबले जातात. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. धर्मांतराच्या या प्रकारांना आळा घालण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल.’’