संतपिठाद्वारे भारतीय परंपरा आणि संस्कृती यांचा अभ्यास करून सामाजिक मूल्ये अन् संस्कार यांची समाजात निर्मिती करण्यात येणार ! – संपादक
संभाजीनगर – ‘गेल्या अनेक वर्षांपासून पैठण येथील बंद असलेले संतपीठ शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये चालू करण्यात येईल, तसेच संतपिठाला आवश्यक तो निधी देण्यात येईल’, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. या बैठकीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उपस्थित होते.
उदय सामंत पुढे म्हणाले की, मराठवाडा ही संतांचा इतिहास सांगणारी भूमी आहे. या भूमीत नावारूपाला येणारी ‘संतपीठ’ ही संकल्पना केवळ विषयांच्या पुस्तकी आणि बौद्धिक शिक्षण यांवर भर देणारी नसेल. हे समाजशास्त्राचे शिक्षापीठ न रहाता समाजसेवेचे दीक्षापीठ होणार आहे. अशा संतपिठात तात्काळ विद्यादानाचे काम चालू होणे आवश्यक आहे. त्यामुळे संतपिठाला निधीची न्यूनता पडू देणार नाही. या पिठाचे नाव ‘संत एकनाथ महाराज संतपीठ’ असे असेल.
सांप्रदायिक कलांचा अभ्यास करण्याचा उद्देश !
पैठण येथे हे संतपीठ उभारले जात आहे. ‘भारतीय परंपरा आणि संस्कृती यांचा अभ्यास करणे, सामाजिक मूल्ये अन् संस्कार यांची समाजात निर्मिती करणे, तसेच सांप्रदायिक कलांचा अभ्यास करणे’, अशी अनेक उद्दिष्टे या संतपिठामागे आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संतपिठातील अभ्यासक्रम लवकरात लवकर चालू करणार आहोत, असे उदय सामंत यांनी सांगितले.
संतपिठात कोणत्या अभ्यासक्रमांचा समावेश असेल ?
‘पैठण येथील संत एकनाथ महाराज संतपिठात ‘तुकाराम गाथा परिचय, ज्ञानेश्वरी परिचय, वारकरी कीर्तन, हरीदासी कीर्तन आणि एकनाथी भागवत परिचय प्रमाणपत्र’ या अभ्यासक्रमांचा समावेश आहे’, अशी माहिती कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. बैठकीत त्यांनी संतपिठातील प्रस्तावित नवीन विभाग आणि अभ्यासक्रम यांचे स्वरूप काय आहे ? याविषयी माहिती दिली. ‘विद्यापिठात संत साहित्य, तत्त्वज्ञान आणि संगीत विभाग यांच्या अंतर्गत एकूण ५ अभ्यासक्रम तुर्तास चालू होणार आहेत’, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकार्यांना संतपिठाला ११ सप्टेंबरला भेट दिली !
बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संतपिठात तात्काळ अभ्यासक्रम चालू करण्यासाठी ज्या अडचणी येतील, त्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या समवेत चर्चा करण्याचे निर्देश विद्यापीठ प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ११ सप्टेंबर या दिवशी पैठण येथील संतपिठाला भेट देऊन तेथील इमारतीची पहाणी केली.