पुणे – शिवसंग्राम आणि मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने राज्यभरात नुकतेच मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करण्यात आले. आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसंग्रामच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी ‘गणेशोत्सवानंतर मराठा समाजातील संघटनांची बैठक घेऊन ‘सारथी’सह मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील’, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्याचे शिवसंग्रामकडून सांगण्यात आले. या बैठकीला मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात नेमलेल्या मंत्रीमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, तसेच शिष्टमंडळातील आमदार मेटे यांच्यासह इतर आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे न्या. गायकवाड आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सुविधा द्याव्यात या मागण्यांसह अन्य विषयांवरही बैठकीमध्ये चर्चा झाली. ‘मराठा आंदोलनात बलीदान दिलेल्या कुटुंबातील एकाला नोकरी देणे आणि आर्थिक साहाय्य करणे यांसंदर्भात तातडीने कार्यवाही करावी’, असे आदेश या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.