‘मराठीच्या भल्यासाठी’ या संस्थेची पुनर्रचना !

स्तुत्य उपक्रम ! यामुळे मराठीला भाषेला चांगले दिवस यायला साहाय्य होईल, अशी आशा करायला हरकत नाही !

पुणे – मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, तसेच ती व्यवहारामध्ये ही वापरली जावी यासाठी  ‘मराठीच्या भल्यासाठी’ ही संस्था कार्यरत रहाणार आहे. याअंतर्गत मराठी भाषा विकास प्राधिकरण, मराठी विद्यापीठ, विज्ञान तंत्रज्ञानाची पुस्तके मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी राज्यस्तरीय अभियान चालू करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली ‘मराठीच्या भल्यासाठी’ या संस्थेची पुनर्रचना महाराष्ट्र साहित्य परिषदेत करण्यात आली. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह संस्थापक अध्यक्ष, साहित्य परिषदेचे कार्यवाह, कार्याध्यक्ष आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.

‘मराठी विद्यापीठ’ स्थापन करणार !

‘उत्तम इंग्रजीसमवेतच उत्तम मराठी आले पाहिजे’, हा भाषेचा संस्कार मुलांवर करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी ही संस्था कार्य करेल’, असे कार्याध्यक्ष देशमुख यांनी या वेळी सांगितले. ‘मराठीच्या भल्यासाठी’ या संस्थेने केलेली मराठी विद्यापिठाची मागणी तत्वतः मान्य केली असून येत्या शैक्षणिक वर्षापासून हे विद्यापीठ चालू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे अध्यक्ष ठाले-पाटील यांनी सांगितले.