इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना भारताच्या विरोधात वापरण्याची आय.एस्.आय.ची सिद्धता  !

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चे षड्यंत्र उघड

पाकच्या या कारवाया कायमस्वरूपी थांबवण्यासाठी पाकला नष्ट करणे अत्यावश्यक आहे, हे भारताला समजेल, तो सुदिन ! – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर तेथील इस्लामिक स्टेटच्या अनेक आतंकवाद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. या आतंकवाद्यांना भारतावर आक्रमण करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये हालवण्याची सिद्धता करत असल्याचे समोर आले आहे.

यापूर्वी इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांची नावे काबुल विमानतळावरील आक्रमणाच्या वेळी समोर आली होती. या आक्रमणामध्ये १३ अमेरिकी सैनिकांसह मोठ्या संख्येने नागरिक ठार झाले होते. वृत्तसंस्थांच्या माहितीप्रमाणे या आतंकवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये मिळालेली अमेरिकी सैनिकांची शस्त्रे पुरवून त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये हालवण्यात येणार आहे. तेथून त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी कारवायांसाठी पाठवण्यात येऊ शकते. याशिवाय तालिबानच्या साहाय्यासाठी पाकिस्तानमधून ८ सहस्रांहून अधिक आतंकवादी अफगाणिस्तानमध्ये गेले होते. तेथील लढाई संपल्यानंतर ते परत पाकिस्तानमध्ये येतांना दिसले आहेत. त्यांनाही आय.एस्.आय. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवू शकते.