रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे कै. अभिजित कुलकर्णी (वय ४६ वर्षे) यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

४.१२.२०२० या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे अभिजित कुलकर्णी (वय ४६ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या संदर्भात त्यांच्या कुटुंबियांना मिळालेल्या पूर्वसूचना आणि त्यांच्या मृत्यूपूर्वी अन् मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कै. अभिजित कुलकर्णी

पू. (श्रीमती) आशा दर्भे (आजी (आईची आई), सनातनच्या ७१ व्या संत (वय ९२ वर्षे)), कोल्हापूर

पू. (श्रीमती) आशा दर्भे

अभिजित यांच्या मृत्यूच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना : ‘अभिजितचा मृत्यू होण्यापूर्वी ४ दिवस मला त्याची पुष्कळ आठवण येत होती आणि ‘त्याच्याविषयी काहीतरी घटना घडलेली ऐकायला मिळणार’, असे मला वाटत होते.’ (जानेवारी २०२१)

श्रीमती अंजली कुलकर्णी (आई), ढवळी, फोंडा, गोवा.

श्रीमती अंजली कुलकर्णी

१. अभिजित यांच्या निधनाच्या आदल्या दिवशी जाणवलेली सूत्रे

१ अ. सकाळी ९.३० वाजता मी ध्यानाला बसले असतांना ध्यानात मला पांढरी शुभ्र पणती लावलेली दिसली.

१ आ. खिडकीतून प्रकाशझोत घरात आल्याचे दिसणे आणि दुसर्‍या दिवशी अभिजित यांचा मृत्यू झाल्यावर ‘या प्रसंगाला तोंड देण्यासाठी देवाने प्रकाशझोताच्या माध्यमातून आधीच शक्ती पुरवली’, असे जाणवणे : मी दुपारी घरात विश्रांती घेत होते. त्या वेळी बाहेरील वातावरण ढगाळ असूनही मला खोलीच्या पश्चिमेकडील खिडकीतून पिवळसर पांढर्‍या रंगाचा प्रकाशझोत घरात आलेला दिसला. तो प्रकाश पाहून ‘तो रामनाथी आश्रमातून आला आहे’, असे मला जाणवले. दुसर्‍या दिवशी अभिजितचा मृत्यू झाला. तेव्हा ‘एवढ्या मोठ्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी देवाने एक दिवस आधीच या प्रकाशझोताच्या माध्यमातून शक्ती पुरवली’, असे मला जाणवले.

१ इ. संध्याकाळी मला ‘दत्त’ हा ग्रंथ वाचण्याची तीव्र इच्छा झाली आणि मी तो पूर्ण ग्रंथ वाचला.

२. अभिजित यांच्या मृत्यूच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना

४.१२.२०२० या दिवशी सकाळी माझ्या मनात अकस्मात् विचार आला, ‘आज मला कुणाच्या तरी मृत्यूची वार्ता ऐकायला मिळेल.’ त्याच दिवशी संध्याकाळी अभिजितचा मृत्यू झाला.

३. अभिजित यांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे

३ अ. ४.१२.२०२० या दिवशी अभिजितचा मृत्यू झाल्यानंतर घरात दाब जाणवत नव्हता. त्याच्या पार्थिवाकडे पाहून मला आणि अश्विनीला (मुलीला) पुष्कळ तेज अन् सात्त्विकता जाणवत होती, तसेच घरातही पुष्कळ शांत वाटत होते.

३ आ. ६.१२.२०२० या दिवशी घरात ज्या ठिकाणी पिठावर पणती लावून ठेवली होती, तिच्यावर ‘ॐ’चा आकार उमटला होता. तो आकार अर्धा दिवस तसाच होता.

३ इ. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतांना आलेल्या अनुभूती

३ इ १. रामनाथी आश्रमात पूर्वेकडून एक गरुड आल्याचे दिसणे, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरुदेव आश्रमातून बाहेर आल्यावर एक पांढर्‍या रंगाचा गोळा गरुडाच्या पाठीवरील देव्हार्‍यात जाऊन बसणे आणि गरुडाने त्या गोळ्यासह उडून जाणे : ६.१२.२०२० या दिवशी सकाळी मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होते. हा नामजप करत असतांना मला पुढील दृश्य दिसले, ‘मी रामनाथी आश्रमात गेले आहे. मी आश्रमाच्या बाहेर असलेल्या कमळपिठापासून काही अंतरावर उभी होते. त्या वेळी मला पूर्व दिशेकडून एक गरुड पक्षी आलेला दिसला. त्याच्या पाठीवर एक लहान देव्हारा दिसत होता. तो गरुड कमळपिठाशेजारी येऊन बसला. काही क्षणांत प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले आश्रमातून बाहेर आले अन् कमळपिठाजवळ गेले. तेव्हा एक पिवळसर पांढर्‍या रंगाचा गोळा त्या गरुडाच्या पाठीवरील देव्हार्‍यात जाऊन बसला. तो गरुड त्या गोळ्यासह देव्हारा घेऊन उडून गेला.’

३ इ २. घरात अभिजित सोवळे नेसून स्वतःचे श्राद्ध करत असल्याचे दिसणे, श्राद्ध झाल्यावर तो निघून जाणे आणि त्या वेळी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू असणे : त्यानंतर मी पुन्हा कोल्हापूरच्या घरात असल्याचे मला जाणवले. त्या वेळी मला घरात अभिजित सोवळे नेसून माझ्याकडे पाठ करून बसलेला दिसला. त्याच्या बाजूला दोन पुरोहित बसले असून अभिजित स्वतःचे श्राद्ध स्वतः करत असल्याचे मला दिसले. ते पुरोहित श्राद्धाचे मंत्र म्हणत असून ‘सव्य’, ‘अपसव्य’ असे शब्द उच्चारत असल्याचे मला ऐकू येत होते. अभिजितने स्वतःचे श्राद्ध करून बोटातील दर्भ तेथील ताम्हणात विसर्जित केला आणि तो निघून गेला. त्या वेळीही माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू होता.

३ इ ३. मी ही अनुभूती अश्विनीला (मुलीला) सांगितल्यावर ती मला म्हणाली, ‘‘आज प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण दिन आहे.’’ हे ऐकून माझी पुष्कळ भावजागृती झाली.

३ इ ४. नामजप करतांना रामनाथी आश्रमातील कमळपिठाच्या समोर एक पांढरी शुभ्र गाय दिसणे : ७.१२.२०२० या दिवशी सकाळी मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होते. तेव्हा मला मी रामनाथी आश्रमात असल्याचे जाणवले. मला आश्रमातील कमळपिठाच्या समोर एक पांढरी शुभ्र गाय फिरत असलेली दिसली.

३ ई. दशक्रिया विधीच्या वेळी आलेल्या अनुभूती

३ ई १. दशक्रिया विधीसाठी जातांना अश्म आणि अस्थी हातांत घेतल्यावर पुष्कळ हलके वाटणे अन् मनगटांपर्यंत थंड संवेदना जाणवणे : १३.१२.२०२० या दिवशी अभिजितच्या दशक्रिया विधीसाठी आम्ही नदीवर जातांना अमित (धाकटा मुलगा) अश्म आणि अभिजितच्या अस्थी घरीच विसरला. त्यामुळे आम्ही त्या आमच्या समवेत घेऊन नदीवर गेलो. ते दोन्ही (अश्म आणि अस्थी) माझ्या हातांत होते. ते हातांत घेतल्यावर मला पुष्कळ हलके वाटले आणि माझ्या मनगटांपर्यंत थंड संवेदना जाणवल्या.

३ ई २. दशक्रिया विधीसाठी नदीजवळ पोचल्यावर एक पांढरी शुभ्र गाय दिसणे आणि ‘ती रामनाथी आश्रमातून आली आहे’, असे वाटणे : आम्ही दशक्रिया विधीसाठी नदीजवळ पोचलो. तेव्हा मला ७.१२.२०२० या दिवशी नामजप करतांना रामनाथी आश्रमात जी गाय दिसली होती, तशीच पांढरी शुभ्र आणि कपाळाला कुंकू लावलेली गाय आमच्या बाजूने गेली. तिला पाहिल्यावर मला ‘ती रामनाथी आश्रमातून आली आहे’, असे वाटले.

३ ई ३. विधीनंतर २ – ४ सेकंदांत कावळ्याने पिंडाला स्पर्श करणे आणि त्या वेळी ‘देवानेच अभिजितची काळजी घेतली’, असे वाटणे : दशक्रिया विधीनंतर २ – ४ सेकंदांत कावळ्याने पिंडाला स्पर्श केला. ते पाहून ‘देवानेच अभिजितची काळजी घेतली. त्याला सर्व मोहमाया आणि आसक्ती यांतून मुक्त केले’, असे वाटून माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

३ उ. तेराव्या आणि चौदाव्या दिवसांचे विधी चालू असतांना जाणवलेली सूत्रे 

३ उ १. ‘घरात मृत्यूनंतरचे दिवसकार्य नसून काहीतरी मंगल कार्य चालू आहे’, असे जाणवणे आणि काही नातेवाइकांनी ‘येथून जाऊ नये’, असे वाटत आहे’, असे सांगणे : १३ व्या आणि १४ व्या दिवसांचे विधी चालू असतांना ‘घरात मृत्यूनंतरचे दिवसकार्य नसून काहीतरी मंगल कार्य चालू आहे’, असे मला सातत्याने जाणवत होते. घरातील वातावरण पुष्कळ हलके झाले होते. आमच्या काही नातेवाइकांनी आम्हाला सांगितले, ‘‘एरव्ही आम्ही कुणाकडे सांत्वन करण्यासाठी गेलो, तर आम्हाला ‘तेथे काही वेळ बसावे’, असे वाटत नाही; पण तुमच्या घरी आल्यावर आम्हाला ‘येथून जाऊ नये’, असे वाटत आहे.’’

३ उ २. विधीच्या वेळी अभिजित यांच्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवणे आणि तो आनंदी असल्याचे जाणवणे : विधीच्या वेळी मला अभिजितच्या छायाचित्रातील त्याच्या आज्ञाचक्रावरील कपाळाचा पूर्ण भाग तेजस्वी दिसत होता. मला त्याच्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवत होता. मला त्याच्या छायाचित्राकडे पाहून आनंदाची स्पंदने जाणवत होती आणि ‘तो पुष्कळ आनंदात आहे’, असे वाटत होते. आम्हाला भेटायला आलेले काही नातेवाईक आणि अन्य व्यक्ती यांनाही त्याच्या छायाचित्राकडे पाहून तसे जाणवले.’ (जानेवारी २०२१)

अश्विनी कुलकर्णी (मोठी बहीण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

अश्‍विनी कुलकर्णी

१. अभिजित यांच्या मृत्यूच्या संदर्भात मिळालेल्या पूर्वसूचना

१ अ. स्वप्नात घराच्या वर एक काळा ढग दिसणे, त्याच्याकडे पाहून ती मृत्यूची सावली असल्याचे जाणवणे आणि ४ मासांनी अभिजित यांचा मृत्यू झाल्यावर त्या स्वप्नाचा उलगडा होणे : ‘सप्टेंबर २०२० मध्ये आई, अभिजित आणि मी गोवा येथे असतांना मला एक स्वप्न पडले. त्यात मला कोल्हापूर येथील आमच्या घराच्या वर एक काळा ढग दिसला. त्याच्याकडे पाहून मला चांगले वाटले नाही. तो ढग पाहून माझ्या मनात आले, ‘घरावर ही मृत्यूची सावली का दिसत आहे ?’ दुसर्‍या दिवशी मी ते स्वप्न आई आणि अभिजित यांना सांगितले. त्या वेळी अभिजित केवळ हसला आणि आईने ‘त्या स्वप्नाचा विचार करायला नको’, असे मला सांगितले. नंतर मी ते स्वप्न विसरून गेले. ऑक्टोबर २०२० मध्ये अभिजित कोल्हापूर येथे गेला आणि डिसेंबरमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्या वेळी मला ते स्वप्न आठवले आणि देवाने मला ‘४ मासांपूर्वीच अभिजितच्या मृत्यूविषयी पूर्वसूचना दिली होती’, असे माझ्या लक्षात आले.

१ आ. घरातील तुळस सुकणे : ऑक्टोबर २०२० मध्ये ज्या दिवशी अभिजित कोल्हापूरला गेला, त्या दिवसापासून आम्ही गोवा येथे रहात असलेल्या सदनिकेतील तुळस सुकू लागली. ५.११.२०२० या दिवशी आई आणि मी दिवाळीसाठी कोल्हापूरला जाण्यास निघालो. त्या दिवशी तुळशीची शेवटची दोन पाने सुकून गळून गेली.

२. अभिजित यांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे

२ अ. अभिजित यांना संतसेवा करण्याची संधी मिळणे आणि ‘त्या माध्यमातून देवाने अभिजित यांच्या जीवनातील सत्सेवा आधीच पूर्ण करवून घेऊन त्यांची काळजी घेतली’, असे जाणवणे : दळणवळण बंदी शिथिल झाल्यानंतर आम्ही (मी आणि अभिजित) रामनाथी आश्रमात नियमित सेवेसाठी येऊ लागलो. तेव्हा भगवंताच्या कृपेने अभिजितला त्याच्या नियमित सेवांच्या व्यतिरिक्त संतसेवा करायला मिळाली. अभिजितचे निधन झाल्यावर ‘देवाने संतसेवेच्या माध्यमातून त्याच्याकडून त्याच्या जीवनातील सत्सेवा आधीच पूर्ण करवून घेऊन त्याची काळजी घेतली’, असे मला जाणवले.

२ आ. विधींच्या वेळी सूक्ष्मातून परात्पर गुरुदेव आल्याचे दिसणे, त्यांनी अभिजित यांना घेऊन जाणार असल्याचे सांगणे : अभिजितच्या १३ व्या आणि १४ व्या दिवशीच्या विधींच्या वेळी ज्या ठिकाणी अभिजितचे छायाचित्र ठेवले होते, त्याच्या बाजूला मला सूक्ष्मातून परात्पर गुरुदेव आसंदीवर बसलेले दिसले. मी त्यांना भावपूर्ण नमस्कार करून विचारले, ‘गुरुदेव, तुम्ही आलात ?’ तेव्हा परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘हो. विधी झाले की, याला (अभिजितला) घेऊन जाणार.’ ते ऐकून ‘अभिजितला परात्पर गुरुदेव त्यांच्या चरणांपाशी घेऊन जाणार आहेत’, असे जाणवून माझे मन आनंदी आणि हलके झाले. (जानेवारी २०२१)

श्री. अमित कुलकर्णी (धाकटा भाऊ), कोल्हापूर

श्री. अमित कुलकर्णी

अभिजित यांच्या मृत्यूच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना : ‘दादाच्या निधनापूर्वी ८ – १० दिवसांपासून मला ‘माझ्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूची वार्ता कळणार’, असे सतत वाटत होते.’ (जानेवारी २०२१)

कृतज्ञता

‘परात्पर गुरुमाऊली, ‘केवळ आपल्या कृपेमुळेच आम्हा सर्व कुटुंबियांना या अत्यंत कठीण प्रसंगात स्थिर रहाता आले. आपणच आम्हाला ही परिस्थिती स्वीकारण्याचे बळ दिले. आपणच आम्हा सर्वांची आणि अभिजितचीही काळजी घेतली’, त्याबद्दल आम्ही सर्व कुटुंबीय आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– अश्विनी कुलकर्णी (मोठी बहीण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जानेवारी २०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक