परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृतीतून साधिकेला शिकायला मिळालेला प्रेमभाव !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. सौ. सुप्रिया माथूर यांनी प्रेमभाव वाढवण्याच्या संदर्भात सांगितलेले सूत्र

‘एकदा सौ. सुप्रियाताईने व्यष्टी साधनेचा आमचा आढावा घेतांना सांगितले, ‘‘आपल्यासमोर कुणी आल्यास केवळ त्याच्याकडे पाहून हसणे, म्हणजे प्रेमभाव नाही. वेळोवेळी ‘आपण एखाद्याला किती साहाय्य करतो’, हेही महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया अंतर्मनाची असते. कुणाला काहीतरी वस्तू दिल्यामुळे प्रेमभाव वाढत नाही, तर प्रेमभाव ही इतरांसाठी आपोआप समर्पित होणारी प्रक्रिया आहे.’’ तेव्हा मला ‘प्रेमभाव म्हणजे नक्की काय ?’, ते लक्षात येत नव्हते.

२. एका रुग्णाईत साधिकेची सेवा चांगली केल्याबद्दल परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रसाद पाठवल्यावर ती सेवा करत असतांना स्वतःच्या मनाच्या स्थितीविषयी साधिकेने केलेले चिंतन

सौ. साधना दहातोंडे

दुस‍र्‍या दिवशी मला ‘एका रुग्णाईत साधिकेची सेवा चांगली केली’, असा निरोप देऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रसाद पाठवला. त्या वेळी ‘ती सेवा मी कशा प्रकारे केली ? आणि त्या वेळी माझ्या मनाची स्थिती कशी होती’, याविषयी झालेले चिंतन येथे दिले आहे.

अ. एका साधिकेला (काकूंना) मध्यरात्री रुग्णालयात भरती केले होते. तिच्यासमवेत मी एकटीच होते. माझ्यासाठी ही परिस्थिती नवीन होती. त्यामुळे माझ्याकडून केवळ परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण होत होते.

आ. आम्ही रुग्णालयात गेल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘येणार्‍या आपत्काळात आपल्याला केवळ साधकांचीच नाही, तर समाजातील लोकांचीसुद्धा अशीच सेवा करावी लागणार आहे.’

इ. काकूंच्या वैद्यकीय चाचण्यांच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर सर्व करवून घेणार आहेत’, याची जाणीव होऊन माझे मन वर्तमान स्थितीत आणि निर्विचार होते.

सौ. सुप्रिया माथूर

ई. काकूंच्या सेवेसाठी रुग्णालयात असतांना मी पूर्णवेळ, म्हणजे २४ घंटे न झोपता बसून होते. एरवी माझे पाय दुखतात आणि ३ – ४ घंट्यांपेक्षा अधिक वेळ सलग बसणे मला शक्य होत नाही. असे असतांना ‘मी २४ घंटे बसणे’, ही परात्पर गुरुदेवांनी मला दिलेली शक्ती होती.

उ. या सेवेसाठी गुरुदेवांनी मला प्रसाद पाठवला. खरेतर तेच माझ्या समवेत राहून मला चैतन्य आणि शक्ती पुरवत होते; मात्र स्वतः नामानिराळे राहून त्यांनी सर्व श्रेय मला दिले. ‘हाच परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवलेला प्रेमभाव आहे आणि पुढील काळात असाच प्रेमभाव वाढवायचा आहे’, हे त्यांनी माझ्या लक्षात आणून दिले. त्याबद्दल मी परात्पर गुरूंच्या चरणी कोटीशः कृृतज्ञ आहे.’

– सौ. साधना दहातोंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०२०)