कणकवली रेल्वेस्थानकात प्रांताधिकार्यांनी पहाणी करून दिल्या सूचना
कणकवली – येथील रेल्वेस्थानकात येणार्या प्रवाशांची आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे; मात्र ही तपासणी चुकवण्यासाठी काही प्रवासी रेल्वेस्थानकातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या अन्य मार्गांचा अवलंब करत असल्याचे उघड झाले आहे. याविषयीची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी रेल्वेस्थानकाला भेट देऊन पहाणी केली आणि रेल्वेस्थानकातून प्रवासी बाहेर पडण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी पोलीस अन् आरोग्य विभाग यांची पथके तैनात करण्याच्या सूचना दिल्या. (बेशिस्त जनता ! – कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होता, तेव्हा प्रशासन आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत असल्याचा ठपका ठेवला जात होता; मात्र आता अल्प झालेला कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी प्रशासन उपाययोजना करत असतांना अतीउत्साही लोकांकडून सहकार्य न होणे, हे निश्चितच निषेधार्ह आहे. अशा लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्यास प्रशासनाला दोष देण्याचा त्यांना अधिकार रहाणार का ? – संपादक)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता कोकणात मोठ्या संख्येने गणेशभक्त येऊ लागले आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि सावधानतेची उपाययोजना म्हणून प्रशासनाने प्रवाशांची आरोग्यतपासणी करण्यासाठी प्रत्येक रेल्वेस्थानकावर पोलीस आणि आरोग्य विभाग यांची पथके तैनात केली आहेत; मात्र रेल्वे गाडी आल्यानंतर होणार्या गर्दीमुळे प्रवाशांची आरोग्यतपासणी करण्यास वेळ लागत आहे. तसेच तपासणीत कोरोनाविषयक चाचणीचा अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आल्यास त्या अनुषंगाने असलेल्या नियमांचे पालन करावे लागेल, या भीतीमुळे काही प्रवासी रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर न पडता, अन्य मार्गांचा अवलंब करून पळवाट शोधत असण्याची शक्यता आहे.