संपादकीय
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मूतील कठुआ येथे एका संस्कृत संस्थानच्या भवनाचा शिलान्यास करतांना ‘पालकांनी त्यांच्या पाल्यांना संस्कृत शिकण्यास प्रेरित केले पाहिजे’, असे आवाहन केले आहे. हे अत्यंत योग्य आहे. देवभाषा संस्कृतचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे, हे आता काही नवीन राहिलेले नाही. काँग्रेसच्या काळात संस्कृतला ‘मृतभाषा’ म्हणूनच घोषित करण्यात आले होते आणि जवाहरलाल नेहरू यांनीच तसे म्हटले होते. देशातून काँग्रेस पदच्युत होऊन ७ वर्षे झाली आहेत. नंतर आलेल्या भाजप शासनाने काही प्रमाणात संस्कृतला सरकारी साहाय्य करण्यास प्रारंभ केला आहे; मात्र संस्कृतचे महत्त्व पहाता ते अत्यंत नगण्य आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. स्वतः सरकारकडून ज्या संस्था, गुरुकुल, शाळा आणि महाविद्यालये संस्कृत शिकवत आहेत, त्यांना अनुदान देण्याचा प्रयत्न होत आहे. हा प्रयत्न तसा पाहिला, तर पुरेसा नाही. सरकारला जर खरेच संस्कृतसाठी काही करायचे असेल, तिचे संवर्धन आणि तिला ऊर्जितावस्था देऊन तिला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी पुष्कळ काही करावे लागणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून भारतामध्ये मदरसे चालू आहेत. मुसलमान मोठ्या संख्येने त्यांच्या पाल्यांना शिकण्यासाठी मदरशांत पाठवतात. मदरशांतील शिक्षण सध्याच्या आधुनिक जगामध्ये अत्यंत मागासलेले असतांना मुसलमान त्यांच्या धर्माविषयीच्या प्रेमामुळे ते मुलाच्या भविष्याचा विचार करण्याऐवजी धर्म, भाषा आणि संस्कृती यांचा विचार करतात, हे हिंदूंनी शिकण्याची आवश्यकता आहे. त्या तुलनेत हिंदूंचे संस्कृत भाषा, संस्कृती आणि हिंदु धर्म यांविषयी किती प्रेम आहे अन् त्यासाठी संपूर्ण त्याग नाही, तर काही प्रमाणात तरी त्याग करून त्यांच्याप्रतीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करत आहेत का ? तर याचे उत्तर ‘नाही’, असेच आहे.
सध्याच्या काळात संस्कृतला जोपर्यंत संपूर्णपणे राजाश्रय मिळत नाही, तोपर्यंत तिचे संवर्धन आणि प्रसार होणे अशक्यच आहे. संस्कृत शिकल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाधिक विद्यालये स्थापन केली, तर शिक्षक आणि कर्मचारी वर्ग हा संस्कृत शिक्षित असेल. त्यामुळे त्यांना नोकरी उपलब्ध होईल. अनेक जण स्वतंत्रपणे संस्कृतचे शिक्षण घेत असतात, तर काही शाळांमध्ये काही प्रमाणात संस्कृत शिकवले जाते. बर्याचदा ती पर्यायी भाषा म्हणूनही असते. त्यामुळे सर्वच जण संस्कृतचा पर्याय निवडतात, असेही नाही. परिणामी संस्कृत शिकणार्यांची एकूण संख्या अल्प होत जाते. ही संख्या वाढली, तर संस्कृतचा प्रसार होऊ शकतो. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे यांनी पुढाकार घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे मृत झालेल्या ‘हिब्रू’ भाषेला ज्यू लोकांनी इस्रायल देश निर्माण केल्यावर तिला जिवंत करून तिचा प्रसार केला, तसे संस्कृतविषयी करणे तितके अवघड जाणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. यासाठी पहिल्या टप्प्यांत संस्कृत विद्यालये चालू करून संस्कृत भाषा शिकणे अनिवार्य करणे आवश्यक आहे. तसे केल्यास हिंदूंना धर्मशिक्षण आणि संस्कृती यांचे ज्ञान मिळेल. सरकारने त्यासाठी प्रयत्न करावेत, असे संस्कृतप्रेमींना वाटते !