उत्तरप्रदेशात अधिकारी आणि दलाल यांच्याकडून राष्ट्रीय पारिवारिक लाभ योजनेमध्ये घोटाळा

पती जिवंत असतांनाही २१ महिला विधवा असल्याचे सांगून पैसे लाटले !  

अशा भ्रष्टाचार्‍यांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाका !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश शासनाने राष्ट्रीय पारिवारिक लाभ योजना चालू केली आहे. यामध्ये दारिद्य्र रेषेखाली असणार्‍या कुटुंबातील प्रमुखाचे ६० वय होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला ३० सहस्र रुपयांचे साहाय्य शासनाकडून मिळते. भ्रष्ट अधिकारी आणि दलाल यांनी २१ बोगस लाभार्थी दाखवून पैशांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. लक्ष्मणपुरीच्या सरोजिनीनगर तालुक्यातील बंथरा आणि चंद्रावल गावांमध्ये २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये एकूण ८८ जणांनी या योजनेचा लाभ घेतला होता.

प्राथमिक तपासामध्ये या लाभार्थ्यांमधील २१ महिला अशा होत्या ज्यांचे पती जिवंत होते. तसेच या महिलांना बनावट पद्धतीने लाभ देण्यात आला होता. लाभार्थी महिलेला या ३० सहस्र रुपयांमधील १० ते १५ सहस्र रुपयेच मिळाले. उर्वरित रक्कम दलाल आणि अधिकारी यांनी लाटले. याआधीही गोरखपूर, बलरामपूर, चित्रकूट, कानपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये असा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. तिथे स्थानिक प्रशासनाने विभागीय कर्मचार्‍यांचे निलंबनही केले होते. (जेव्हा प्रथम अशी घटना उघडकीस आली, तेव्हाच कठोर तपासणी करण्यात आली असती आणि उत्तरदायींना शिक्षा केली असती, तर अन्यांना याचा वचक बसला असता ! – संपादक)