‘डान्सबार’ कुणामुळे चालू ?

‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या वार्ताहरांनी ठाणे येथील डान्सबारच्या स्थितीचे ‘स्टींग ऑपरेशन’ (एखाद्या व्यक्तीचे किंवा समूहाचे गुन्हेगारी कृत्य उघड करण्यासाठी त्यांच्या नकळत केलेले चित्रीकरण) केले. त्यानंतर ते चित्रीकरण वृत्तवाहिनीवर दाखवले. या वृत्तामध्ये दळणवळण बंदी असतांनाही ठाणे येथे डझनभर डान्सबार चालू आहेत. एका डान्सबारमध्ये २५-३० मुली, १५-२० काम करणारी मुले आणि अन्य असे ७०-८० जण आहेत. तसेच ग्राहक म्हणून येणार्‍यांची संख्याही बर्‍याच प्रमाणात आहे. एका डान्सबारच्या बाहेर लावलेल्या फलकावर ‘दुपारी ३ ते रात्री ७ ‘हॅपी अवर्स’ (आनंदी तास)’, असे लिहिले आहे आदी दाखवण्यात आले. कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये नाट्यगृहे, दुकाने, मंदिरे, शाळा बंद आहेत. एवढेच नव्हे, तर वारीवरही कडक निर्बंध लावले आहेत. ठाण्यामध्ये जी दुकाने चालू आहेत, ती केवळ सायंकाळी ४ पर्यंत चालू आहेत, तसेच कुणी सरकारने दळणवळण बंदीविषयी केलेले नियम तोडल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे. असे असतांना डान्सबार राजरोजपणे चालू असणे हे कुणामुळे ? हा प्रश्न सामान्यांच्या मनात येतो. प्रशासन आणि पोलीस यांच्या मर्जीमुळेच डान्सबार चालू आहेत, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

प्रतिकात्मक छायाचित्र

 

वरील वृत्त प्रसारित झाल्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी लगेचच त्याची नोंद घेतली आणि ४ पोलीस अधिकार्‍यांचे स्थानांतर केले, तसेच ३ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची चौकशी अतिरिक्त पोलीस आयुक्त करणार, असे वृत्त झळकले. जणूकाही ‘एबीपी माझा’ने दाखवले म्हणूनच समजले आणि आम्ही त्याच्यावर आता तातडीने कारवाई केली, असे दाखवण्याचा जणू सोपस्कार पार पाडला. चालू असलेले डान्सबार महापालिकेला आणि पोलिसांना ठाऊक नसणार, यावर कुणाचा विश्वास बसेल ? असे आहे तर हे डान्सबार कुणामुळे चालू आहेत, हे शोधले पाहिजे. केवळ स्थानांतरासारखी तात्पुरती उपाययोजना काढून विषय बाजूला केल्यास पुन्हा डान्सबार चालू होतील.

डान्सबार बंद व्हावेत, यासाठी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले. वरील वृत्ताच्या निमित्ताने विषयाला आरंभ झालेलाच आहे, तर प्रशासनाने आता कठोर भूमिका घेऊन डान्सबार कायमस्वरूपी कसे बंद होतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत. महिलांनीही यामध्ये पुढाकार घेऊन विषय तडीस न्यावा, ही अपेक्षा !

– वैद्या (कु.) माया पाटील, देवद, पनवेल.