गोव्यातील मुरगावचा श्री दामोदर भजनी सप्ताह यंदाही मर्यादित स्वरूपात साजरा होणार

  • सर्व सार्वजनिक कार्यक्रम रहित

  • मंदिरात कुणालाही प्रवेश नाही *

  • दुकाने नसतील

मुरगावचा श्री दामोदर भजनी सप्ताह

वास्को – येथील प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताह यंदाही कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिकरित्या साजरा होणार नाही. कोणत्याही विशेष कार्यक्रमांविना सप्ताह आयोजित करण्याचा निर्णय १४ जुलैला श्री दामोदर भजनी सप्ताह कार्यकारी समिती आणि उत्सव समिती यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. प्रशांत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सलग दुसर्‍या वर्षी सप्ताह मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना बगल देण्यात आली आहे.

श्री दामोदर भजनी सप्ताहाचे यंदाचे १२२ वे वर्ष असून, येत्या १४ ऑगस्ट या दिवशीच्या उत्सवाला मंदिरात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, तसेच मंदिर परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी, मुरगाव नगरपालिका आणि वास्को पोलीस ठाणे यांना निवेदन दिले जाणार आहे. प्रतिवर्षी भरणारी फेरी (जत्रेतील दुकाने) आणि मंदिराबाहेर फुलांचे विक्रेते यांनाही यंदा अनुमती दिली जाणार नाही. सप्ताहाच्या दिवशी मंदिराकडे येणारे पारही (भजन करणारे गट) रहित करण्यात आले असून, त्याऐवजी पार समित्यांना मंदिरात येण्यासाठी वेळ निश्‍चित केली जाईल.

२४ घंटे अखंडितपणे चालणार्‍या साखळी भजनाला बगल देण्यात आली असून त्याऐवजी वेगळ्या पद्धतीने मंदिरात २४ घंटे भजन ठेवण्याविषयी विचार चालू आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही भजनी सप्ताहाचा प्रारंभ पारंपरिक गजर आणि एका अभंगाने करण्यास  दोन्ही समितीच्या पदाधिकार्‍यांनी मान्यता दिली आहे.