राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील २ निवासस्थानी ‘ईडी’ची पुन्हा धाड !

डावीकडे अनिल देशमुख

नागपूर – राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या काटोल, तसेच वडविहिरा येथील २ निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने (‘ईडी’ने) १८ जुलै या दिवशी सकाळी ८ वाजता धाड टाकली. ‘ईडी’ने दोन्ही निवासस्थानांची झाडाझडती चालू केली आहे. या कारवाईचे वृत्त समजताच देशमुख यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर पुष्कळ गर्दी केली होती. या वेळी त्यांनी या कारवाईच्या विरोधात घोषणा दिल्या.

मुंबई येथील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी ‘अनिल देशमुख यांनी बारचालकांकडून १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते’, असा आरोप केलेला आहे. त्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ‘ईडी’कडून अनिल देशमुख यांची चौकशी केली जात आहे. २ दिवसांपूर्वी ‘ईडी’ने वरळी आणि उरण (जिल्हा रायगड) येथील देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ताही जप्त केली होती.