देवद आश्रमातील पू. गुरुनाथ दाभोलकर यांच्या लहानपणी त्यांच्या मनावर परिणाम करणारे प्रसंग आणि सनातन संस्थेत आल्यावर त्यांनी अनुभवलेली साधकांची एकमेकांविषयीची समरसता !

२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. 

आज आपण देवद आश्रमातील सनातनचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकर यांच्या जीवनातील काही प्रसंग येथे पाहूया

पू. गुरुनाथ दाभोलकर

जन्मदिनांक : १५.०२.१९४०

वाढदिवस : माघ शुक्ल पक्ष सप्तमी (१९.२.२०२१) या दिवशी वाढदिवस झाला.

संतपदी विराजमान : ५ मे २०१४

‘वर्ष १९९५ मध्ये कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे झालेल्या गुरुपौर्णिमेनंतर मी सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. तेव्हापासून माझ्या साधनेला आरंभ झाला. तत्पूर्वी मला ‘साधना म्हणजे  काय ?’ ‘श्रद्धा, भाव-भक्ती, तसेच ‘गुरु म्हणजे काय ? त्यांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व  काय ?’, याविषयीचे काहीही ज्ञान नव्हते. केवळ गरीब सात्त्विक कुटुंबात माझा जन्म झाल्याने थोडेसे सत् होते; पण संग नव्हता. तो मला ‘सनातन संस्थे’च्या संपर्कात आल्यावर लाभला.

साधकांनो, ‘सनातन’चे आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संत हे केवळ संत नाहीत, तर गुरुच असल्याने त्यांच्याकडून शिका अन् ते कृतीत आणून त्यांचा खर्‍या अर्थाने लाभ करून घ्या आणि साधनेत शीघ्र गतीने पुढे जा !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘आतापर्यंत सनातनचे आणि सनातनच्या शिकवणीप्रमाणे साधना करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे मिळून १११ साधक संत झाले आहेत. यांतील काहीजण ठिकठिकाणी जाऊन साधकांना साधनेसंदर्भात अगदी देहत्याग होईपर्यंत मार्गदर्शन करतात. आपण त्यांना ‘समष्टी संत’ म्हणतो. त्यांचे कार्य गुरूंप्रमाणेच साधनेत मार्गदर्शन करण्याचे आहे; म्हणून त्यांची माहिती सर्व साधकांना व्हावी आणि साधकांना संतांकडून काहीतरी शिकायला मिळावे, यासाठी त्यांच्याविषयीचे जागेनुसार काही लिखाण ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करत आहोत. त्या माहितीत काही संत आणि साधक यांनी लिहिलेली संतांची गुणवैशिष्ट्ये, शिकवण, त्यांच्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती, त्यांनी स्वतःविषयी, कुटुंबियांविषयी, इतर साधकांविषयी आणि संतांविषयी लिहिलेले लिखाण, त्यांनी केलेल्या कविता किंवा त्यांच्यावर इतर साधकांनी केलेल्या कविता इत्यादी विषयांवर लिखाण आहे. हे लिखाण वाचून त्यांच्याविषयी सर्वांनाच जवळीक वाटण्यास साहाय्य होईल आणि जगभरातील सर्वच साधकांना त्यांची तोंडओळख होईल. संतांची वैशिष्ट्ये केवळ वाचू नका, तर ती स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे या लेखमालेचे खर्‍या अर्थाने सार्थक होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘मला सन्मार्गाला लावणार्‍या आधुनिक वैद्य सामंत यांचा लोकांना बाह्यदृष्टी देण्याचा व्यवसाय आहे. (ते डोळ्यांचे डॉक्टर आहेत.) त्याचसमवेत आता ते लोकांची अध्यात्माद्वारे अंतर्दृष्टी जागृत करण्याचे दैवी कार्यही करत आहेत.’ – पू. गुरुनाथ दाभोलकर (१५.४.२०२०)

१. सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी

१ अ. आयुष्यात दैवयोगाने एकाच गावचे, एकाच ज्ञातीचे (जातीचे) आणि एकाच आडनावाचे २ आधुनिक वैद्य येणे अन् आधुनिक वैद्य संजय सामंत यांनी अध्यात्माची नवसंजीवनी देऊन सन्मार्गाला लावणे : माझ्या आयुष्यात दैवयोगाने एकाच गावचे, एकाच ज्ञातीचे (जातीचे) आणि एकाच आडनावाचे २ आधुनिक वैद्य आले. एकाने मला आयुष्यातून उठवले, तर दुसर्‍याने मला अध्यात्माची नवसंजीवनी देऊन सन्मार्गाला लावले. या यशस्वी आधुनिक वैद्यांचे नाव आहे संजय सामंत ! ते मुळचे वेंगुर्ले (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील असून आता ते वैद्यकीय व्यवसायानिमित्त कुडाळ येथे स्थायिक झाले आहेत. गुरुकृपेने त्यांचा व्यवसाय उत्तम प्रकारे चालला आहे. ते व्यवसाय सांभाळून अध्यात्मप्रसाराचे कार्य श्रद्धापूर्वक पार पाडत आहेत.

१ आ. आधुनिक वैद्य संजय सामंत यांना वर्ष १९९५ ची गुरुपौर्णिमा, प.पू. भक्तराज महाराज यांचे तेथील अस्तित्व अन् मार्गदर्शन यांचा मोठा लाभ होणे : आधुनिक वैद्य सामंत यांचा वर्ष १९९५ च्या कुडाळ (सिंधुदुर्ग) येथील गुरुपौर्णिमेपर्यंत अध्यात्माशी काहीही संबंध नव्हता. केवळ दैवयोगाने एका जुन्या मित्राच्या आग्रहाने ते या गुरुपौर्णिमेला उपस्थित राहिले होते. प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व आणि मार्गदर्शन यांचा त्यांना मोठाच लाभ झाला. त्यांना गुरुपौर्णिमेचा आनंद अनुभवण्यास मिळाला. याच्या परिणामस्वरूप दुसर्‍या दिवसापासूनच त्यांनी अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करायला आरंभ केला.

२. सनातन संस्थेशी संपर्क

२ अ. सनातन संस्थेच्या सत्संगाला गेल्यावर तेथील मार्गदर्शनाने फार प्रभावित होणे आणि जणू ‘मार्गदर्शक आले, ते बोलले आणि ते जिंकले’, असे घडणे : आधुनिक वैद्य संजय सामंत प्रसारासाठी आमच्या वाडीत (कांबळी वाडीत) आले होते. त्यांनी त्याच रात्री ९ वाजता आमच्या वाडीतील श्री हेळेकर मंदिरात सत्संगाचे आयोजन केले होते. तो माझ्या आयुष्यातील पहिलाच सत्संग होता. माझे त्या सत्संगाद्वारे अध्यात्मात आणि सनातन संस्थेत पडलेले पहिलेच पाऊल होते. या सत्संगासाठी अनुभवी मार्गदर्शक श्री. दिलीप आठलेकर, श्री. रंजन देसाई,  श्री. प्रकाश मालोंडकर आणि आधुनिक वैद्य संजय सामंत आले होते. सत्संगात आमच्या उभादांडा गावातील केवळ ८ – ९ जिज्ञासू उपस्थित होते. तेव्हा श्री. आठलेकर यांनी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन माझ्या मनावर पुष्कळ बिंबले. ‘मी आजपर्यंत जे शोधत होतो आणि मला जे पाहिजे होते, ते मला सनातन संस्थेच्या सत्संगांतून मिळणार’, याची माझ्या मनाला निश्चिती वाटली अन् त्याच क्षणी मी सनातनचा झालो. जणू वरील सर्व मार्गदर्शक आले, त्यांनी पाहिले, ते बोलले आणि ते जिंकून गेले !

२ आ. प्रचार आणि प्रसार करतांना पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ करणे : या सत्संगामधून बोध घेऊन मी त्वरित उत्तरदायी साधकांच्या सूचना आणि आज्ञा यांनुसार प्रचार अन् प्रसार करण्यास आरंभ केला. मी प्रत्येक आठवड्याला कुडाळ येथील श्री. देसाईकाकांच्या आस्थापनातील जागेत होणार्‍या सत्संगासाठी उपस्थित रहात होतो आणि संधी मिळेल त्याप्रमाणे सहसाधकांसमवेत जिल्ह्यातही प्रचार आणि प्रसार करायला जात होतो. मी लवकरच पूर्णवेळ साधनाही करायला आरंभ केला. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलाच पूर्णवेळ साधना करणारा साधक होतो.

२ इ. मार्गदर्शक साधक ब्राह्मण किंवा उच्चवर्णीय असल्यामुळे त्यांच्या समवेत जेवायला बसतांना पुष्कळ संकोच वाटणे : जिल्ह्यात प्रसारसेवा करतांना किंवा कुडाळ सेवाकेंद्रात सेवा करतांना माझा अधिकाधिक वेळ उच्चवर्णियांमध्ये जात होता, उदा. उद्योगपती श्री. रंजन देसाई, श्री. दिलीप आठलेकर, डॉ. रमेश पेंढारकर, त्यांचे बंधू श्री. गणेश पेंढारकर, श्री. प्रकाश मालोंडकर इत्यादी. अशा अनेक धुरंधर मार्गदर्शकांसमवेत मला सेवा करायला मिळत असे. वेळप्रसंगी त्यांच्या समवेत भोजनाला बसायचीही वेळ येई आणि हेच एक माझ्या दुर्बल मनाचे शल्य होते. ते सतत माझ्या मनाला टोचत असे; कारण हे सारे ब्राह्मण, सारस्वत, सुवर्णकार, असे उच्चवर्णीय, तर मी भंडारी ! त्यामुळे त्यांच्या समवेत जेवायला बसायला मला संकोच वाटत असे. हा संकोच वाटण्याचे मूळ कारण मला विस्ताराने सांगावेसे वाटते.

२ इ १. बालपण

२ इ १ अ. मोठे कुटुंब : माझ्या लहानपणी आमच्या कुटुंबात आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू आणि आत्या अशी मंडळी होती. माझे आजोबा अत्यंत सात्त्विक, पापभीरू आणि उपकारांची अतीव जाणीव ठेवणारे, असे होते. आमचे पूर्वज मूळचे गोव्याचे; पण पोर्तुगिजांच्या छळांमुळे ते कोकणात येऊन स्थायिक झाले.

२ इ १ आ. कौटुंबिक कलहामुळे आजोबांना एकत्र रहाणे अशक्य होणे; पण ‘कुठे रहाणार ?’, अशी चिंता वाटणे : पूर्वी आजोबांचे एकत्र पुष्कळ मोठे कुटुंब होते. कुटुंबात ३ – ४ काका, ५ – ६ चुलत भाऊ आणि इतर कुटुंबीय मिळून २० ते २५ जणांचे कुटुंब होते. कालांतराने आजोबांना कौटुंबिक कलहामुळे एकत्र रहाणे कठीण होऊ लागले. शेवटी आजोबांनी वेगळे रहायचे ठरवले; पण ‘जाणार कुठे ? रहाणार कुठे ? जवळ पैसा नाही, घराचा आसरा नाही, कसे होणार ?’, अशी त्यांना चिंता होती.

२ इ २. आजोबांच्या बालपणीच्या सवंगड्याने त्यांना साहाय्य करणे

२ इ २ अ. बालपणीच्या सवंगड्याने आसरा देऊन आर्थिक चिंताही मिटवणे : आजोबांच्या या कठीण प्रसंगात शेजारचे बालपणीचे दयाळू मित्र (सवंगडी) त्यांच्या साहाय्याला धावून आले. त्यांचे टोपणनाव बापू होते. बापू भूमीमालक (जमीनदार) आणि मोठे बागाईतदार होते. या सुहृदय माणसाने आजोबांना आसरा दिला. त्यांनी आजोबांना ६ गुंठे बागाईतीची जागा राखणीला दिली आणि १ एकर शेतभूमीही कसायला दिली. त्यामुळे बापू म्हणजे आजोबांचे परमेश्वर होते. ते जेथे जातील, तेथे आजोबा त्यांच्या समवेत सावलीसारखे असायचे. बापूंच्याच कृपेने आजोबांनी त्यांच्या बागाईत भूमीत स्वतःचे छोटेसे घरकुल बांधले आणि मुला-बाळांसह तेथे स्वतंत्र राहिले. बापू जातीने सारस्वत होते.

२ इ २ आ. बापू जातीने सारस्वत असल्याने आणि आजोबा जातीने भंडारी असल्याने आजोबांना बापूंच्या घरच्या ओट्यावरही प्रवेश निषिद्ध असणे, तरी आजोबांनी आयुष्यभर त्यांचे उपकार स्मरणे आणि नेहमीच त्यांना देवासमान मानणे : आजोबा त्या दानशूर व्यक्तीच्या उपकाराचे ऋण आयुष्यभर डोक्यावर घेऊन जगले. त्यांनी केलेल्या उपकारांची परतफेड म्हणून आजोबांनी त्यांच्याकडे आयुष्यभर शारीरिक कष्ट केले. ते शेतीचे काम आणि दोन्ही वेळेचे जेवण एवढ्या वेळेपुरतेच घरी असायचे. बाकी पूर्ण वेळ आजोबा त्यांच्या धन्याच्या (बापूंच्या) घरी कामाला असायचे. असे असले, तरी त्या काळात आजोबांना बापूंच्या घरी ओट्यावरही प्रवेश नव्हता. ते आजोबांना सकाळ-संध्याकाळी चहा देत असत; पण तो चहा आजोबांसाठी बाहेर ठेवलेल्या एका पितळी फुलपात्रात आणून ओतत. ते फुलपात्र आजोबांनी ठरल्या जागेतून घेऊन चहा पिऊन झाल्यावर परत धुऊन त्याच जागी ठेवायचे, अशी पद्धत होती. आमच्या आजीलाही वेळप्रसंगी बापूंच्या घरी घरकामाला जावे लागत होते. आजीही आजोबांप्रमाणेच बापूंच्या संपूर्ण कुटुंबाला देवासमान मानत होती.

२ इ २ इ. पूर्वीच्या काळात ब्राह्मणेतरांना सारस्वतांच्या घरातच काय; पण ओसरीवरही प्रवेश नसणे, स्पर्श निषिद्ध असल्यामुळे सर्व गोष्टी लांबूनच दिल्या-घेतल्या जात असणे : त्या काळी आजोबांनाच काय, तर कुणाही ब्राह्मणेतरांना सारस्वतांच्या ओटीवरही प्रवेश नव्हता. कुळांपैकी कुणी भेटायला आल्यास ओसरीच्या पायर्‍यांजवळून बोलावे लागायचे.  कुळांना काही द्यायचे अथवा त्यांच्याकडून घ्यायचे असल्यास त्यांच्यासमोर पुढे हात करायचा, मग जे काही द्यायचे असेल, ते वरून हातात टाकत. कुळाने पैसे द्यायला आणले, तरी तेही त्यांच्या बाजूला भूमीवर ठेवावे लागत असत. मग त्यावर किंचित पाणी शिंपडून नंतरच ते स्वीकारत असत.

२ इ ३. वर्णद्वेषी वागण्याचा बालमनावर झालेला परिणाम !

२ इ ३ अ. प्रसंग १ – ब्राह्मण समोरून जात असतांना त्यांच्यासमोर बाकावर बसल्याने आजोबांनी मारणे : आमच्या घराच्या पाठीमागे हाकेच्या अंतरावर समुद्र आहे. लोकांची समुद्रावर जाण्या-येण्याची वाट आमच्या घराच्या अंगणातूनच जाते. आमच्या वाडीतील एक सारस्वत बागाईतदार व्यवसायाने अधिवक्ता होते. कधीकधी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ते बागेत जात असत. एकदा ते असेच बागेत जात असतांना मी आमच्या अंगणात एका छोट्याशा बाकावर बसलो होतो. त्या वेळी मी केवळ  ७ – ८ वर्षांचा होतो. ‘ते येत आहेत’, हे पाहून ओट्यावर बसलेले माझे आजोबा आधीच उठून अदबीने उभे राहिले. ते अधिवक्ता इकडे-तिकडे न पहाता थेट पुढे निघून गेले. इतक्यात काही कळण्याच्या आत आजोबा माझ्याजवळ आले आणि त्यांनी खाडकन माझ्या एक थोबाडीत मारली. मला कळेना, ‘माझा अपराध काय ?’ आजोबा रागावून म्हणाले, ‘‘तुला कळत नाही का ? बामण समोरून जातो आणि तू बाकावर बसून राहिलास ?’’ ‘बामणांविषयी आदर ठेवून अदबीने वागायला पाहिजे’, ही मला माझ्या बालपणातच आजोबांकडून मिळालेली पहिली शिकवण होती.

२ इ ३ आ. प्रसंग २ – बापूंच्या नातवांचे मौजीबंधन समारंभ आणि त्या वेळी घडलेला प्रसंग !

१. बापूंच्या घरी मौजीबंधनानिमित्त पुष्कळ पाहुणे येणे, घराच्या पुढे-मागे मांडव घातला जाणे : या प्रसंगानंतर काहीच मासांनी बापूंकडे एकाच वेळी त्यांच्या २ नातवांचा मौजीबंधन समारंभ आयोजित केला होता. बापूंनी मुंजीसाठी त्यांच्या प्रशस्त अंगणात कुळांकडून भलामोठा मंडप घालून घेतला होता. त्यांच्या घराच्या मागील दारी कुळांसाठीही मंडप घातला होता. कुळांच्या जेवणाच्या पंगती या मंडपात बसत होत्या.

२. मौजीबंधन असलेल्या मुलांच्या वागण्यात कुठलाही परकेपणा नसणे : बापूंच्या ज्या नातवांचे मौजीबंधन होते, ते दोघे, त्यांची अन्य भावंडे आणि वाडीतील मुले यांच्या समवेत माझे शाळेत जाणे- येणे, खेळणे इत्यादी नेहमी एकत्रितच असायचे. मी त्यांच्याशी नेहमी मिळून-मिसळून असायचो. त्या मुलांनाही माझ्याविषयी कधीच कसलाही परकेपणा वाटायचा नाही.

३. मौजीबंधनाच्या दिवशी रात्री सवंगड्यांसमवेत जेवायला बसलेले पाहून काकांनी मला सर्वांसमोर कानफटात मारून रागाने पंगतीतून फरपटत नेणे : मुंजीच्या कार्यक्रमाच्या जेवणाच्या वेळी बामण मंडळींच्या जेवणाच्या पंगती अंगणात बसल्या होत्या. अजाणपणे मीही मुलांसमवेत त्यांच्या पंगतीत बसलो. त्या वेळी ‘या पंगतीत मी बसायचे नाही’, ही कल्पनाही मला नव्हती. केवळ ‘सवंगड्यांसमवेत जेवायला बसायचे’, या उद्देशाने मी त्यांच्या पंगतीत जेवायला बसलो. अजून जेवायला आरंभ केला नव्हता. एवढ्यात माझे काका मला शोधत तेथे आले. ‘मी बामणाच्या पंगतीत जेवायला बसलो आहे’, हे पहाताच ते माझ्याजवळ आले आणि माझ्या कानफटात मारून त्यांनी मला फरफटत मागच्या मंडपात नेले. अशा प्रसंगांमुळे आणि घरातील जाणत्यांच्या रितीरिवाजामुळे, ‘बामण म्हणजे देव ! त्यांच्यासमवेत किंवा त्यांच्या पंगतीत जेवायला बसणे, म्हणजे पाप !’ ही माझ्या मनाची धारणा झाली.

२ ई. सनातन संस्थेत जात-पात हा विषयच नसणे, सर्व जण एका सामायिक भावाने रहात असणे, साधकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पूर्वीचा हा संस्कार पुसट होऊ शकणे : माझ्या मनावर लहानपणापासून झालेल्या या संस्कारामुळे साधनेत आल्यावरही तो संस्कार माझ्या मनावरून पुसला जात नव्हता. वास्तविक सनातन संस्थेत कसलेच जाती-पातीचे बंधन नाही. याविषयी कुणीच कुणाला, कधीही, काहीही विचारतही नाहीत. श्री. माधव गाडगीळ (आजोबा), श्री. अनिल (अप्पा) कुलकर्णी आदी साधकांनी माझ्या मनावर झालेला हा संस्कार दूर करण्यासाठी बराच प्रयत्न केला आहे आणि करतही आहेत. तेव्हा आता कुठे माझ्या मनातील तो संस्कार पुसट होत आहे.

मला प्रथमतः साधना सांगून सनातन संस्थेत आणणारे आधुनिक वैद्य संजय सामंत आणि त्या वेळचे मार्गदर्शक यांचा मी अत्यंत ऋणी आहे आणि राहीन.’

– (पू.) गुरुनाथ दाभोलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.४.२०२०)

सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सर्व संतांनी स्वतःच्या संदर्भातील, तसेच वाचक अन् साधक यांनी संत आणि संतांच्या अनुभूतीच्या संदर्भातील लिखाण लवकरात लवकर पाठवावे !

‘सनातनच्या संतांच्या लिखाणातून सर्वांना आनंद मिळावा, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातून सर्वांना शिकता यावे’, यासाठी सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व संतांनी स्वत:चे साधनापूर्व जीवन, साधनाप्रवास, त्यांनी साधक आणि जिज्ञासू यांना केलेले वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन इत्यादी सर्व लिखाण शक्य तितक्या लवकर पाठवावे (यापूर्वी जे लिखाण पाठवले असेल, ते कृपया पुन्हा पाठवू नये.), तसेच वाचक आणि साधक यांनी त्यांना संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पाठवाव्यात. लिखाण शक्यतो टंकलेखन करून पाठवावे.

लिखाण पाठवण्यासाठी संगणकीय पत्ता : [email protected]

पोस्टाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, २४/बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१