धरणक्षेत्रात रहाणार्‍यांनो, स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी सतर्क रहा !

साधकांना सूचना आणि वाचक हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना विनंती !

‘शासनकर्त्यांनी विकासासाठी लहान आणि मोठी अनेक धरणे बांधली आहेत; पण सध्याच्या परिस्थितीत ही धरणे मानवासाठी धोक्याची बनली आहेत.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. दुरुस्ती न केल्यामुळे धरणे फुटण्याचा धोका

पावसाळा चालू झाल्यावर धरणे फुटण्याच्या घटना देशभरात कुठे ना कुठे घडत असतात. विशेष म्हणजे या धरणांच्या सुरक्षिततेचे परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र शासकीय विभाग आहेत; पण या विभागांनी धरणे फुटण्यापूर्वीच जनतेला सतर्क करून हानी रोखली, असे कधी घडत नाही. सध्याच्या काळात धरणे सुरक्षित वाटत असली, तरीही जलशास्त्रीय दृष्टीने त्यांचे पुन:पुन्हा परीक्षण करणे अत्यंत गरजेचे असते. शासन परीक्षणे करते; पण धरणांची दुरुस्ती करत नाही, अशी अवस्था देशभरात आहे.

महाराष्ट्राचे उदाहरण घेतल्यास ‘धरण सुरक्षितता मंडळ’ (डी.एस्.ओ.) ही संस्था वेळोवेळी धरणांची सुरक्षितता पडताळते. या मंडळाने २०१७ – २०१८ चा वार्षिक अहवाल बनवला होता. तातडीची, अल्प दुरुस्तीची आणि कामचलाऊ (दर्जा १, २ आणि ३) असे धरणांच्या दुरुस्तीचे प्राधान्य त्यांनी सर्वेक्षणाअंती ठरवले होते. या मंडळाच्या २०१७ – २०१८ च्या वार्षिक अहवालातून लक्षात आलेल्या धरणांच्या दुरुस्तीतील ठळक त्रुटी पुढे दिल्या आहेत.

अ. महाराष्ट्रातील ३१३ धरणांकरता (२३ टक्के धरणांकरता) ‘दर्जा २’ प्रकारातील दुरुस्तीची आवश्यकता आहे. इतर १ सहस्र १२ धरणांना थोड्या दुरुस्तीची वा काहीच दुरुस्तीची आवश्यकता नाही. ‘कॅग’च्या (नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या) लेखापरीक्षण (ऑडिट) अहवालाप्रमाणे ‘दर्जा २’मधील ३१३ धरणांपैकी केवळ १३ धरणांची दुरुस्ती पूर्ण झाली असून ७७ धरणांची अंशत: झाली (म्हणजे पूर्ण झाली नाही.) आहे, म्हणजे ३०० धरणांच्या दुरुस्तीची कामे बाकी आहेत.

आ. महाराष्ट्रात सिंचन आणि पाणीपुरवठा कामांसाठी २ सहस्र १०० छोटी धरणे, तलाव, जलाशय इत्यादी बांधलेले आहेत; परंतु कित्येक ठिकाणी त्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे.

२. युद्धजन्य स्थितीत शत्रूने धरणे फोडण्याचा धोका !

युद्धाच्या प्रसंगात शत्रूराष्ट्राची अधिकाधिक हानी करण्यासाठी धरणे फोडण्यासारख्या कारवाया केल्या जातात. यातून अपरिमित मनुष्य आणि वित्त हानी होते. अशा परिस्थितीत धरणांच्या सुरक्षेचे कोणतेही धोरण शासनकर्त्यांकडे नाही.

३. आतंकवाद्यांकडून घातपात घडवण्यासाठी धरणे फोडण्याचे कारस्थान !

भारतातील मोठी धरणे फोडून घातपाती कारवाया घडवण्याचे कारस्थान आतंकवादी संघटना रचत असल्याचे गुप्तचर संघटनांनी सांगितले आहे. तरीही धरणांच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था सरकारने केलेली नाही.

थोडक्यात, जनतेचा जीव धोक्यात असतांना धरणांची दुरुस्ती आणि सुरक्षा यांसाठी आतापर्यंत कोणत्याच सरकारने गांभीर्याने प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे यापुढे प्रयत्न होतील, अशी अपेक्षा बाळगू नये. त्याऐवजी धरणक्षेत्रात रहाणार्‍या जनतेने कोणत्याही कारणाने धरण फुटल्यास आपला आणि आपल्या कुटुंबियांचा जीव कधीही धोक्यात येऊ शकतो, हे लक्षात घेऊन आताच सतर्कतेची उपाययोजना करावी.’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.६.२०२१)