नगर येथे संपादक आणि पानटपरीचालक यांच्या विरोधात गुन्हा नोंद

संपादकावर खंडणी मागितल्याचा, तर टपरीचालकाने संपादकांविरोधात खोटी तक्रार दिल्याचा आरोप

प्रतिकात्मक छायाचित्र

नगर – पानटपरीचालकाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून १० सहस्र रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी येथील सायं दैनिकाच्या संपादकांना अटक करण्यात आली आहे. पानटपरीचालकाने केलेला आरोप खोटा असल्याचा दावा करण्यात आल्याने या प्रकरणी टपरीचालकालाही कह्यात घेण्यात आले आहे. मनोज मोतियानी असे संपादकांचे नाव असून काशिनाथ शिंदे असे टपरीचालकाचे नाव आहे. दोघांवरही गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

‘नगर प्रेस क्लब’ने संपादकांच्या अटकेचा निषेध केला आहे. ‘प्रेस क्लब’ने ‘हा गुन्हा खोटा आहे. तो मागे घ्यावा. टपरीचालक अवैध व्यवसाय करत असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्याच्या रागातून त्याने खोटी तक्रार दिली आहे. त्यामुळे संपादकांवरील गुन्हा रहित करावा’, अशी मागणी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन पत्रकारांना दिले आहे.