३ दिवसांची होती समयमर्यादा !
|
पणजी, १२ जून (वार्ता.) – गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होऊन रुग्ण दगावण्याच्या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी सरकारने नेमलेल्या ३ सदस्यीय अन्वेषण समितीने घटनेला १ मास उलटूनही अन्वेषणाचा अहवाल शासनाला सुपुर्द केलेला नाही. समिती नेमल्यानंतर ३ दिवसांच्या आत अहवाल देण्यास समितीला सांगण्यात आले होतेे.
गोमेकॉत ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने १३ मे या दिवशी ‘आयआयटी’चे संचालक डॉ. बी.के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली गोमेकॉचे माजी अधिष्ठाता (डीन) डॉ. व्ही.एन्.जिंदाल आणि शहरी विकास खात्याचे सचिव तारिक थॉमस यांची एक अन्वेषण समिती नेमली होती. याविषयी अधिक माहिती देतांना शासनाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की,
१. अन्वेषण समितीतील २ सदस्य त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याने घरी अलगीकरणात होते; मात्र आता समितीने अन्वेषणाला प्रारंभ केला आहे.
२. संबंधित सदस्यांचे अलगीकरण संपल्यानंतर समिती अहवाल सुपुर्द करणार आहे.
३. मध्यंतरी शासनाने समितीमध्ये सचिव तारिक थॉमस यांच्याजागी महसूल खात्याच्या सचिव संजय कुमार यांची नेमणूक केली आहे.