कनिष्ठ न्यायालयाने ‘तहेलका’चे माजी प्रमुख संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक अत्याचार प्रकरणी निर्दोष मुक्तता केल्याचे प्रकरण
कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय वरचे न्यायालय पालटते, त्यामुळे सामान्य व्यक्तींचा संभ्रम होतो ! असे का होते, याचे न्याययंत्रणेने विश्लेषण करणे आवश्यक !
पणजी, २ जून (वार्ता.) – ‘तहेलका’चे माजी प्रमुख संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणी म्हापसा येथील सत्र न्यायालयाने २१ मे या दिवशी निर्दोष सुटका केली होती. गोवा शासनाने कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात आव्हान दिले आहे. गोवा खंडपिठाने २ जून या दिवशी गोवा शासनाची ही आव्हान याचिका प्रविष्ट करून घेऊन तरुण तेजपाल यांना नोटीस बजावली आहे. गोवा खंडपिठाने कनिष्ठ न्यायालयाकडून न्यायालयीन प्रक्रियेसंदर्भातील सर्व कागदपत्रे मागितली आहेत. गोवा खंडपिठाचे न्यायाधीश एस्.सी.गुप्ते यांच्या खंडपिठाने ही आव्हान याचिका प्रविष्ट करून घेतली आहे. या वेळी सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात गोवा शासनाच्या वतीने बाजू मांडली. या वेळी न्यायाधीश एस्.सी.गुप्ते कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर टीपणी करतांना म्हणाले, ‘‘कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय हा ‘बलात्कार झालेल्या पीडित महिलेने कसे वागावे ?’, याविषयी माहिती देणार्या एका पुस्तकाप्रमाणे आहे.’’